Aurangabad Water Issue: औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसला तरीही किमान तीन दिवसांआड पाणी मिळण्याची शक्यता असता आता तीही फोल ठरली आहे. कारण औरंगाबाद शहरातील 60 टक्के भागाला तीन दिवसांआड आणि 40 टक्के भागाला सातव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याची योजना राबविणे अतिशय अडचणीचे होत असल्याचे निवेदन करत शहराला पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याची परवानगी देण्याची विनंती महापालिकेने बुधवारी झालेल्या सुनावणीत औरंगाबाद खंडपीठाकडे (Aurangabad Bench) केली. यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी संबंधित विधिज्ञांकडे विचारणा करून महापालिकेची विनंती मान्य केली. याचिकेवर पुढील सुनावणी 14  फेब्रुवारीला होणार आहे.


औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. आजही अनेक भागात सात ते आठ दिवसांनी पिण्याचे पाणी येत आहे. त्यामुळे याबाबत औरंगाबादच्या खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शहरातील 60 टक्के भागाला तीन दिवसांआड आणि 40 टक्के भागाला सातव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याची योजना राबवणार असल्याची माहिती महानगरपालिकेने न्यायालयात दिली होती. मात्र आता ही योजना राबविणे अतिशय अडचणीचे होत असल्याचं मनपा प्रशासनाने न्यायालयात खुलासा केला आहे. त्यामुळे शहराला पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याची परवानगी देण्याची विनंती महापालिकेने केली होती. त्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता औरंगाबादकरांना तिसऱ्या दिवशी पाणी मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. दरम्यान येत्या उन्हाळ्यात औरंगाबाद शहर पिण्याच्या पाण्याबाबत टँकरमुक्त होईल, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली.


खंडपीठाने दिलेले निर्देश... 


पाणीपुरवठा योजनेतील सात जलकुंभांचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होईल, हे पाहावे. 


सध्याची एक किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याच्या कामाची गती वाढवावी. 


योजनेच्या आराखड्यानुसार दरदिवशी चार किलोमीटरपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यापर्यंतची गती वाढवावी. 


कंत्राटदार कंपनी जीव्हीप- व्हीआरला केलेल्या कामाचे देयकातील 158  कोटी रुपये देण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने घ्यावा


त्यासाठी 8 फेब्रुवारी रोजी समितीच्या सर्व सदस्यांची बैठक घेऊन त्यामध्ये देयके देण्याच्या संदर्भातील निर्णय घ्यावा, असेही खंडपीठाने म्हटले आहे.


पुन्हा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत... 


शहराचा पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. बुधवारीदेखील सायंकाळी रेल्वे स्टेशन उड्डाणपूलाखाली 1400 मीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आला. जलवाहिनीचा पत्रा फाटल्यामुळे वेल्डिंगचे काम हाती घेण्यात आले, रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. नक्षत्रवाडी येथील एमबीआरमधून शहराकडे दोन जलवाहिन्या येतात. त्यांतील एक अकराशे मिमी आणि चौदाशे मिमी व्यासाची आहे. अकराशे मिमी व्यासाची एक्स्प्रेस जलवाहिनी ही सिडको, हडकोकडे जाते. तर चौदाशे मिमीची जलवाहिनी रल्वेस्टेशनमार्गे क्रांती चौकाकडे येते. बुधवारी सायंकाळी चौदाशे मिमी व्यासाची जलवाहिनी रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली अचानक फुटली. अर्धा तास लाखो लिटर पाणी नाल्यातून वाहून गेले. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाने धाव घेतली. तसेच पाणीपुरवठा बंद करून, जलवाहिनीचे काम केले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


औरंगाबादमध्ये माजी नगरसेवकाच्या झुणका भाकर केंद्रावर महापालिकेने फिरवला जेसीबी; विरोधासाठी जमाव जमला पण...