Aurangabad News : राज्यात भाजप-शिवसेनेचं (BJP-Shiv Sena) सरकार असताना विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंग (Phone Tapping) प्रकरणानंतर सावध भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी पक्षातील मुख्य पदाधिकारी, नेते, उपनेते, आमदार, खासदारांच्या पीएसह सर्व स्टाफना फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फोन टॅपिंगचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे. 


याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, आत्ताच्या घडीला ज्याप्रमाणे राजकारण सुरू आहे, त्यानुसार आपापली सुरक्षा घेण्याची गरज आहे. त्यामुळे पक्षातील प्रमुख लोकांनी आयफोन वापरला पाहिजे अशा सूचना मी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांना दिल्या असल्याचे दानवे म्हणाले. याबाबत पक्षाकडून अधिकृत सूचना नाही. मात्र जबाबदार लोकांनी जबाबदारीने राहिले पाहिजे आणि बोलले पाहिजे. अनेकदा बोलताना चुकून चार चौघात एखादा शब्द निघून जातो. त्यामुळे रेकॉर्डिंग होते आणि त्याचा मोठा विषय बनवला जातो. अशातच काळजी घेतली पाहिजे, असेही दानवे म्हणाले.