Bhondubaba : औरंगाबादच्या पारुंडी गावातील बाबासाहेब शिंदे नावाच्या भोंदूबाबाचा 'एबीपी माझा'ने भांडाफोड करताच त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सुद्धा या बाबावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत सुळे यांनी ट्वीट करत, प्रगतीशील विचारांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे अंधश्रद्धेतून लोकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा असे म्हंटलं आहे. 


काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे...


सुप्रिया सुळे यांनी 'एबीपी माझा'ची बातमी शेअर करत म्हंटलं आहे की,  छत्रपती संभाजीनगर मधील एक भोंदूबाबा केवळ डोक्यावर हात ठेवून आजार बरा करीत असल्याचे वृत्त 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने दाखविले आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असून या प्रकरणी चौकशी करुन तातडीने कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की, कृपया आपण यावर तातडीने कारवाई करावी. प्रगतीशील विचारांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे अंधश्रद्धेतून लोकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा,असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे. 






उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू राहणीमान असलेला बाबासाहेब शिंदे नावाचा हा व्यक्ती स्वतःला येशुंचा भक्त सांगतो. सोबतच येशुंच्या आशीर्वादानेच आरोग्य सेवा देत असल्याचा दावाही हा बाबा करतो. ज्या रुग्णांवर डॉक्टरही उपचार करू शकले नाहीत,त्यांच्यावर आपण उपचार करून त्यांना बरे केल्याचा दावा हा डॉक्टर करतो. एवढच नाही तर एड्स, शुगर, कॅन्सर सारख्या आजारांवर सुद्धा आपण उपचार केले असल्याचा दावा हा बाबा करतो. 


प्रशासनाकडून दखल...


औरंगाबादच्या भोंदूगिरी करणाऱ्या बाबासाहेब शिंदेचा खरा चेहरा एबीपी माझाने समोर आणताच प्रशासन सुद्धा खडबडून जागं झालं आहे. तर पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पारुंडी गावात जाऊन पाहणी केली आहे. तर रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे गोरगरीब लोकांना खोटी आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या या बाबावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या...


Aurangabad: औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा


Aurangabad: 'माझा'ने भोंदूबाबाची बातमी दाखवताच राजकीय मंडळीही आक्रमक; मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश