Aurangabad News: औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर मध्यरात्री पंधरापेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर महामार्गावरील ढोरेगाव फाटा येथे ही घटना घडली आहे. मात्र पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने बसमधील बारा ते पंधरा प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र त्यानंतर बस जळून पूर्णपणे खाक झाली आहे.
याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दोन वाजेच्या सुमारास एसटी महामंडळाची (ST Mahamandal) नाशिकहून ते हिंगोलीला जाणाऱ्या बसने ढोरेगाव फाट्याच्या फौजी ढाबा समोर अचानक पेट घेतला. सुरवातीला नेमकं काय झालं हे चालकाच्या सुद्धा लक्षात आले नाही. मात्र गाडीतून धूर निघत असल्याने पाहणी केली असता आग लागल्याच समोर आले. विशेष म्हणजे काही करण्याच्या आधीच आगीचा भडका वाढला आणि पाहता-पाहता संपूर्ण गाडीने पेट घेतला.
प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं...
चालत्या बसला आग लागली असून, ती ढोरेगाव फाट्यावर उभी असल्याची माहिती काही नागरिकांनी गंगापूर पोलिसांना दिली. त्यामुळे माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक चौरे पथकासह घटनास्थळी पोहचले. यावेळी बसमध्ये बारा ते पंधरा प्रवाशी अडकलेले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना पोलिसांनी बाहेर काढलं. त्यामुळे मोठी जिवंत हानी टळली असून,सुदैवाने बसचे चालक-वाहकासह सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
अग्निशामक दलाने विझवली बस...
प्रवाशांना बाहेर काढल्यावर पोलिसांनी याबाबतची माहिती अग्निशमन दलाला दिली. मात्र तोपर्यंत बस संपूर्णपणे पेटली होती. आगीचा भडका एवढा होता की बसच्या जवळ सुद्धा उभं राहणे अवघड होते. त्यात बसच्या टायरने सुद्धा पेट घेतल्याने आग आणखीनच वाढली होती. दरम्यान पोलिसांनी माहिती देताच अग्निशमन दलाने काही वेळेतच घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवली. मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.
मध्यरात्री गावकरी रस्त्यावर...
औरंगाबाद-अहमदनगर रस्त्यावर ढोरेगाव आहे. तर अनेक घरं महामार्गावरच आहे. त्यामुळे बसला आग लागल्याची माहिती गावकऱ्यांना लगेचच मिळाली. त्यामुळे अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. तर अचानक लागलेल्या आगीमुळे अनेक प्रवाशी प्रचंड घाबरले होते त्यांना सुद्धा धीर देण्याचे काम गावकऱ्यांनी यावेळी केल्याचे पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: मुलींच्या मदतीला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला गुंडांकडून मारहाण; गुन्हा मात्र....