Raj Thackeray: राज ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर; संपूर्णपणे खाजगी दौरा असणार
Raj Thackeray In Aurangabad: आज संध्याकाळी साडेचार वाजता विमानाने राज ठाकरे औरंगाबादमध्ये पोहचणार आहे.
Raj Thackeray In Aurangabad: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज औरंगाबादच्या (Aurangabad) दौऱ्यावर येणार आहेत. मात्र राज ठाकरे यांचा हा दौरा संपूर्णपणे खाजगी दौरा असणार असल्याची माहिती मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. मनसेतील एका नेत्याच्या मुलाच्या विवाहासाठी राज ठाकरे औरंगाबादमध्ये येणार आहे. आज संध्याकाळी साडेचार वाजता विमानाने राज ठाकरे औरंगाबादमध्ये पोहचणार आहे. तर आजचा मुक्काम देखील ते औरंगाबादमध्येच करणार आहे.
मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. सायंकाळी साडेचार वाजता औरंगाबाद विमानतळावर (Aurangabad Airport) राज ठाकरे यांचे आगमन होईल. यावेळी मनसे पदाधिकारी त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर राज ठाकरे हे पक्षाचे उपाध्यक्ष गणेश सातपुते यांच्या मुलाच्या विवाहस्थळी उपस्थित राहून लग्नाच्या शुभेच्छा देतील. तसेच त्यानंतर हॉटेल रामा येथे राज ठाकरे मुक्कामी असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता पुन्हा ते विमानाने मुंबईकडे रवाना होतील.
राज ठाकरेंचा संपूर्ण खाजगी दौरा असणार!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,राज ठाकरे आज संध्याकाळी साडेचार वाजता औरंगाबाद शहरात दाखल होतील. मात्र त्यांचा हा दौरा संपूर्णपणे खाजगी असणार आहे. तर राज ठाकरे फक्त गणेश सातपुते यांच्या मुलाच्या विवाहसाठी उपस्थितीत राहणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात कोणतेही पक्षाचे कार्यक्रम होणार नाही. तसेच पक्षाच्या कोणत्याही बैठका देखील होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनसेत शांती-शांती!
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंनी औरंगाबाद जिल्ह्यातील पक्ष कार्यकारणीत मोठ्याप्रमाणात बदल केला होता. त्यानंतर काही दिवस शहरात मनसे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे पाहायला देखील मिळालं. वेगवेगळ्या मुद्द्यावरून मनसेच्या नेत्यांनी आंदोलने देखील केली. अनेक पक्षप्रवेश झाले. पुढे राज ठाकरेंची औरंगाबाद येथे जाहीर सभा झाली. विशेष म्हणजे राज ठाकरेंची ही सभा गाजली देखील होती. परंतु त्यानंतर शहरातील आणि जिल्ह्यातील मनसेमध्ये शांती-शांती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे महत्त्वाचे नेते देखील सक्रिय नसल्याचे पाहायला मिळत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या दौऱ्यात राज ठाकरे जिल्ह्यातील मनसे नेत्यांना काही सल्ला देणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Ajit Pawar: विरोधी पक्षनेते अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर; शेतकरी मेळाव्याला लावणार हजेरी