Food Poisoning In Marathwada: नवरात्रोत्सवानिमित्त खरेदी केलेल्या भगर व भगरीचें पिठातून  विषबाधेचे सत्र सुरूच असून, मराठवाड्यातील 500 पेक्षा अधिक नागरिकांना विषबाधा झाली असल्याचे समोर आले आहे. ज्यात सर्वाधिक संख्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकट्या वैजापूर तालुक्यात 118 जणांना विषबाधा झाली आहे. तर जालना,बीड जिल्ह्यात देखील अनेकांना भगरीतून विषबाधा झाली आहे. 


सुरवातीला औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथील 13 नागरिकांना विषबाधा झाली होती. त्यानंतर त्याच गावात आणखी 12 जणांना विषबाधा झाली. वैजापूर तालुक्यातील 118 जणांना विषबाधा झाली आहे. तर कन्नड तालुक्यातील 12 जणांना विषबाधा झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालय फुल्ल झाली आहे. विशेष म्हणजे वरील आकडेवारी शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची असून, खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या सुद्धा अधिक आहे. त्यामुळे विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. 


जालना, बीड, जिल्ह्यातही विषबाधा...


बीड जिल्ह्यात उपवासासाठी भगरीची भाकर खाल्याने 15 गावातील 108 लोकांना उलट्या, मळमळ आणि जुलाब असा त्रास झाला. ज्यात बीड शहरासह शिरूर आणि गेवराई येथील नागरिकांचा समावेश आहे. तर जालना जिल्ह्यातील परतूर येथील 16 जणांना भगरीतून विषबाधा झाली आहे. या सर्वांना तात्काळ रुग्णालयात दाखल करत उपचार करण्यात आले आहे. तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अशीच काही परिस्थिती असल्याचे सुद्धा समोर आले आहे. 


आपत्ती व्यववस्थापन समिती व अन्न औषध प्रशासन यांच्या वतीने भगरीतून विषबाधा प्रकरणी घ्यावयाची काळजी व करावयाची उपाययोजना या संदर्भात जनतेसाठी खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहे.



  • नागरिकांनी कोणत्याही घाऊक-किरकोळ व्यापाऱ्यांकडून, आठवडी बाजारातून, फेरी वाल्याकडुन सुटी भगर अथवा त्याचे पिठ घेऊन सेवन करू नये.

  • नागरिकांनी कुठल्याही धार्मीक समारंभात किंवा घरगुती कार्यक्रमात प्रसाद म्हणुन किंवा उपवासाचा पदार्थ म्हणुन भगर वापरु नये किंवा सेवन करू नये.

  • भगर सेवन केल्यामुळे कोणाला विषबाधा झाल्यास किंवा प्रकृती अस्वस्थ झाल्यास कोणतेही गावठी उपचार करु नये रुग्णांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करावे.

  • भगर विक्रीचा किरकोळ अथवा घाऊक व्यापारी निर्दशनास आल्यास त्याची माहिती अन्न निरीक्षक यांना तात्काळ दयावी, स्वतः कायदा हातात घेवुन कुठलीही कृती करु नये.

  • किराणा दुकानातून खरेदी करत असलेल्या पाकिटावर FSSI चा परवाना क्रमांक आहे का हे तपासावे.

  • खादय वस्तु खरेदी करत असतांना संबंधित पाकीटाचे सील तपासुन पहावे, तसेच खादय पदार्थाच्या  पाकीटावरील उत्पादन दिनांक व वापराची मुदत संपण्याची दिनांक तपासून पाहावे.


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad News: धक्कादायक! नवरात्रोत्सवानिमित्त खरेदी केलेल्या भगरीतून विषबाधा; औरंगाबाद, जालन्यात खळबळ


PFI Ban: पीएफआयवर बंदी का घातली? केंद्र सरकारने सांगितली 'ही' कारणं