Aurangabad News: औरंगाबादमध्ये एमआयएमच्या माजी नगरसेवकावर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एमआयएमचे माजी नगरसेवक अज्जू नाईकवाडी यांना मारहाण करण्यात आली आहे. जुन्या वादावरून झालेल्या वादातून मारहाण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, अज्जू नाईकवाडी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहरातील चिश्तीया चौकात अज्जू नाईकवाडी आणि नाशेर शेख यांच्यामध्ये जुन्या वादातून सुरवातीला एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर दोघांमध्ये थेट हाणामारी सुरु झाली. दरम्यान नाईकवाडी यांच्यात डोक्यात रॉड मारल्याने डोके फुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले...
घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना नाशेर शेखसह तिघांना ताब्यात घेतले आहे. तर घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या मारहाणीत नाईकवाडी यांच्यात डोक्याला मोठी गंभीर जखम झाली असून, हात फॅक्चर झाला आहे.