Ambadas Danve: राज्यात झालेल्या अतिवृष्टी, संततधार यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यात पीक विम्याचा (Crop Insurance)  परतावाही शेतकऱ्यांना मिळत नाही. यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक पवित्रा घेत, शेतकऱ्यांना नडू नका असा इशारा पीक विमा कंपन्यांना दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी आज आय.सी.आय.सी.आय (ICIC) लोंबार्ड जनरल इन्शुरन्स पीक विम्या कंपनीच्या प्रभादेवी येथील मुख्यालयाला भेट देऊन कंपनी प्रशासनाला जाब विचारताना दानवे यांनी हा इशारा दिला आहे. तसेच एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी लि., भारतीय कृषी विमा कंपनी यांच्या अधिकाऱ्यांसोबत देखील विधानभवनातील दालनात अंबादास दानवे यांनी बैठक घेऊन पीक विम्याच्या परताव्याचा आढावा घेतला.


शेतकऱ्यांना पीक विमा मदत मिळत नसून आधीच अतिवृष्टी व संततधार यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पीक विम्या कंपन्यांची आढावा बैठक घेण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी दूरध्वनीद्वारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली होती. या मागणी नंतर आज कृषी मंत्र्यांनी सर्व पीक विम्या कंपन्यांची आढावा बैठक बोलावली होती. यावेळी दानवे यांनी पीक विमा कंपन्यांचा समाचार घेतला. 


पीक विमा कंपन्या टाळूवरचे लोणी खातायत 


राज्यात झालेल्या शेतीच्या नुकसानानंतर पीकविमा नाकारण्याचे प्रमाण 70 ते 80 टक्क्यांवर आहे. विमा कंपन्या एकप्रकारे शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खातायत. मदतही वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करतोय. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना आग्रही भूमिका मांडत असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली. तर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांवर जबरदस्ती करत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा अंबादास दानवेंनी यावेळी दिला आहे. 


'ठाकरेंची सेना' उतरणार रस्त्यावर


शेतकरी संकटात असतांना त्यांची वीज कनेक्शन महावितरणकडून बंद केले जात आहे. विशेष म्हणजे रब्बीचा हंगाम सुरु असून पिकांना पाण्याची गरज असतांना महावितरण अशाप्रकारे कारवाई करत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून 1 डिसेंबरला औरंगाबाद जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आठ वेगवेगळ्या ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. 


Ambadas Danve : जबदस्तीनं शेतकऱ्यांची वीज तोडणी सुरु, दावनेंचा सरकारवर हल्लाबोल, शिवसेना रस्त्यावर उतरणार