Aurangabad Crime News: अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. खरीप हातून गेला असून, रब्बी वाचवण्यासाठी बळीराजाची धरपड सुरु आहे. अशातही काही लाचखोर सरकारी बाबू शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचे समोर आले आहे. मात्र औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात एका शेतकरी पुत्राने आपल्या बापाला लाच मागणाऱ्या महावितरणाच्या अधिकाऱ्याला चांगलाच धडा शिकवला असून, या अधिकाऱ्याची रवानगी थेट जेलमध्ये झाली आहे. 


वीज पंपाच्या नविन जोडणीसाठी लाच मागणारा कन्नड तालुक्यातील औराळा वीज उपकेंद्राचा विद्युत सहायकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या औरंगाबाद पथकाने सोमवारी पकडले आहे. या बाबत तक्रारदाराच्या वडीलांच्या शेतात वीज पंप बसविण्यासाठी नविन इलेक्ट्रिक मीटर व जोडणी बसवून देण्यासाठी औराळा वीज उपकेंद्राचा विद्युत सहाय्यक ऋषीकेश गंगाधर वाडेकर (वय 28 वर्षे) याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील तीन हजार रुपये त्याने पुर्वीच स्विकारले होते. तर उरलेल्या दोन हजार रुपयांची मागणी केली असतांना ही रक्कम पंचासमक्ष स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले आहे.


शेतकऱ्याच्या पोरानं धडा शिकवला...


सद्या रब्बीचा हंगामा सुरु असून, शेतात गहूची लागवड करण्यात आली आहे.  तर पिकांना पाण्याची गरज असल्याने शेतकऱ्यांची वीजजोडणीसाठी धरपड सुरु आहे. दरम्यान कन्नड तालुक्यातील औराळा वीज उपकेंद्राच्या अंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांना मात्र वीज जोडणीसाठी विद्युत सहाय्यक ऋषीकेश गंगाधर वाडेकर हा लाच दिल्याशिवाय कनेक्शन देत नसल्याने शेतकरी हतबल झाले होते. यावेळी तक्रारदार तरुणाच्या वडिलांकडे देखील वाडेकर याने लाच मागितली होती. त्यांनी त्याला तीन हजार देऊन देखील वाडेकर हा आणखी दोन हजाराची लाच मागत होता. त्यामुळे त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेत तक्रारदार शेतकरी पुत्राने औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली आणि त्याला लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले. वाडेकर याच्यावर झालेल्या कारवाईनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी तक्रारदार मुलाचे आभार मानत समाधान व्यक्त केला आहे. 


यांनी केली कारवाई...


या कारवाई ला.प्र.वि. औरंगाबाद पोलिस अधीक्षक संदीप आठोळे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उप अधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पोलिस उप अधीक्षक दिलीप साबळे, सापळा पथक पोलिस अंमलदार भिमराव जिवडे, विलास चव्हाण, पोलिस हवालदार थोरात, चालक, अंमलदार सोनावणे यांनी पार पाडली. भ्रष्टाचार संबंधित कोणाला काही तक्रार असल्यास औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक औरंगाबाद यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.