Aurangabad News: राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकल हिंदू समाजाकडून वैजापूर तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान पोलिसांची परवानगी न घेताच मोर्चाचे आयोजन करण्यात आला होते. त्यामुळे पोलिसांची परवानगी न घेताच मोर्चाचे आयोजन केल्याप्रकरणी भाजयुमोचे उपाध्यक्षासह तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या वैजापूर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी सोमवारी वैजापूर शहरात मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा मोर्चा शहरातील महाराणा महाराणा प्रताप पुतळ्यापासून निघून, तहसील कार्यालयावर धडकला होता. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की देशातील अन्य राज्याप्रमाणेच लव्ह जिहादविरोधात महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा अंमलात आणावा. लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून छळ होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. श्रद्धा वालकर हिने धर्मांतर करण्यास विरोध केल्यान नराधम आफताबने तिचे 35 तुकडे केले, असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पोलिसात गुन्हा दाखल...
लव्ह जिहादच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी रविवारी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने वैजापूर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. शिवाय या तिघांनाही नोटीस देत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन न करण्याबाबत समज दिली होती. मात्र त्यानंतरही मोर्चा काढण्यात आल्याने गोपनीय शाखेचे विजय भोटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष गौरव दौडे (टिळक रोड, वैजापूर) यांच्यासह सौरव धामणे (स्वामी समर्थ नगर वैजापूर), स्वप्नील राजपूत (परदेशी गल्ली, वैजापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'या' आहेत प्रमुख मागण्या...
- श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबला फाशीची शिक्षा द्यावी.
- लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून छळ होण्याच्या घटनेत वाढ होत आहे.
- राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा.
- झोपलेल्या सरकारमुळे धर्म रक्षणासाठी मूक मोर्चा काढण्याची वेळ आली आहे.
यामुळे गुन्हा दाखल...
यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील आरोपींनी विनापरवाना बेकायदेशिररित्या पाच पेक्षा जास्त लोकांना जमवुन वैजापूरच्या तहसिल कार्यालयावर मूक मोर्चा काढला होता. सद्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जमावबंदी आदेश लागू असतांना या आदेशाचे उलंघन करण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मोठी बातमी! सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात 'ठाकरेंची सेना' उतरणार रस्त्यावर; चक्काजाम करणार