Ambadas Danve On Shinde Group: 'गटप्रमुख मेळावा तो सिर्फ झाकी है, दसरा मेळावा' अभी बाकी है'; दानवेंचा शिंदे सेनेला टोला
Ambadas Danve On Shinde Group: मुंबई शिवसेनेची असून, शिवसेना प्रमुखांच्या विचाराची असल्याचं अंबादास दानवे म्हणाले
Ambadas Danve On Shinde Group: दसऱ्या मेळाव्यापुर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईमध्ये गट प्रमुख मेळावा घेतला. याच मेळाव्यातून शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. दरम्यान 'गटप्रमुख मेळावा तो सिर्फ झाकी है, दसरा मेळावा' अभी बाकी है' अशी टीका शिंदे सेनेवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
यावर बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, दिल्लीतून जे वेगवेगळे पातशहा येत आहेत त्यांना उद्धव ठाकरेंनी इशारा दिला आहे. आजचा जर मेळावा बघितला तर बसण्यासाठी जागा नव्हती, एवढ्या मोठ्याप्रमाणात गट प्रमुखांनी हजेरी लावली. हा तर फक्त मुंबईचा मेळावा होता अजून महाराष्ट्र येण्याचं बाकी आहे. त्यामुळे 'समझनेवालों को इशारा काफी है' मुंबई शिवसेनेची असून, शिवसेना प्रमुखांच्या विचाराची असल्याचं दानवे म्हणाले.
मुंबईचा विकास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे, अहमदाबाद, पुणे, नागपूर सारख्या शहरात कमरेएवढं पाणी तुंबलं आणि घरांमध्ये घुसल्याचं पाहायला मिळाले. मात्र याचवेळी मुंबईमध्ये पाण्याचा निचरा इतका सुव्यवस्थेत झाला हे एक त्याचे उदाहरण असल्याचं दानवे म्हणाले.
दसरा मेळावा शिवतीर्थावरच
गेल्या काही दिवसांपासून दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात वाद सुरू आहे. दोन्ही बाजूने शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्याचा दावा केला जातोय. मात्र अद्यापी महानगरपालिकेने कुणालाही परवानगी दिलेली नाही. मात्र बुधवारी गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलतांना उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असं ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे शिवसेना दसरा मेळावा होणार आणि तोही शिवतीर्थावरच हा होणार यावर उद्धव ठाकरेंसह शिवसेना ठाम आहे.
दानवेंच्या नेतृत्वाखाली निदर्शने...
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात औरंगाबादमध्ये आज शिवसेनेकडून निदर्शने करण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने केली जाणार आहे. औरंगाबादच्या टीव्ही सेंटरच्या छत्रपती संभाजी महाराज चौकात सकाळी साडेदहा वाजता ही निदर्शने केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या...