Navratri 2022 Chondhala Devi: आगळीवेगळी प्रथा असलेल्या चौंढाळ्याच्या रेणुका मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात
Aurangabad: नवरात्रात उत्सवाला मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते.
Aurangabad Choundhala Village: आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. दरम्यान औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील चौंढाळा गावातील रेणुका माता मंदिरात (Renuka Mata Mandir) सुद्धा आजपासून नवरात्र उत्सवाला (Navratri Utsav 2022) सुरुवात झाली. या गावातील आगळ्यावेगळ्या प्रथामुळे हे गाव आणि रेणुका माता मंदिर नेहमीच चर्चेत राहिले आहे. कारण या गावात लग्न न करण्याची प्रथा असून, प्रत्येक लग्नसमारंभ गावाच्या वेशीबाहेर करण्यात येते. तसेच आणखी अशाच काही प्रथामुळे या गावाची आणि रेणुका माता मंदिराची नेहमीच चर्चा होते.
चौंढाळा रेणुका मातेच्या मंदिरात आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांसह परिसरातील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. पुढील 9 दिवस मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव गावात साजरा केला जातो. विशेष म्हणजे यासाठी इतर जिल्ह्यातील भाविक सुद्धा येत असतात. माहूरच्या देवीचं उपपीठ असल्याने रेणुका मातेच्या मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सवाला वेगळ महत्व आहे. तसेच नवरात्रात उत्सवाला मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते.
गावात लग्न होतच नाही...
पैठणच्या चौंढाळा गावात रेणुका देवीचं पुरातन मंदिर आहे. हे मंदिर माहूरच्या देवीचं उपपीठ असल्याचं गावकऱ्यांकडून सांगण्यात येते. या गावातील गावकरी रेणुका मातेच्या श्रद्धेपोटी किंवा भीतीमुळे शेकडो वर्षांपासून काही प्रथा पाळतात. ज्यात गावात लग्न न करण्याची एक प्रथा आहे. रेणुका देवी अविवाहित राहिली, त्यामुळे तिचा कोप होऊ नये म्हणून गावात लग्न लावली जात नाही. जर गावात लग्न असल्यास ते गावाच्या बाहेर म्हणजेच शिवपलीकडे जाऊन लावली जाते. विशेष म्हणजे आजही गावात ही प्रथा पाळली जाते.
गावात फक्त एकमजली घर...
या गावात आणखी एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते, ती म्हणजे या गावातील बहुतांश घरांची उंची सारखीच आहे. कारण या गावात कुणीच दुमजली घर बांधत नाही. गावात असलेल्या रेणुका मातेच्या मंदिरापेक्षा आपलं घर उंच असू नयेत अशी गावकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे गावात कुणीच दुमजली घर बांधत नाही.
खाट नसलेलं गाव...
या गावात आणखी एक आगळीवेगळी प्रथा असून, या गावात जवळपास सर्वच जमिनीवरच झोपतात. कारण या गावात कोणत्याच गावकऱ्याच्या घरात खाट किंवा पलंग नाही. याला पर्याय म्हणून गावकऱ्यांनी सिमेटचे ओटे बनवले आहेत. या गावातील या प्रथा अनेकांना विचित्र वाटत असल्या तरीही गेल्या कित्येक वर्षांपासून चौंढाळा गावातील गावकरी मात्र या प्रथा न चुकता पाळत आहेत.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad Navratri 2022 : तब्बल 350 वर्षांची परंपरा असलेल्या कर्णपूरा यात्रेला आजपासून सुरुवात
Navratri 2022 : शारदीय नवरात्रीला करा आई अंबेची 'ही' आरती, सर्व मनोकामना होतील पूर्ण