Maharashtra Vs Karnataka Issue: कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादाचे (Maharashtra-Karnataka Border Dispute) पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायाला मिळत असतांना आता औरंगाबादमध्ये (Aurangabad) देखील याचे पडसाद पाहायला मिळत आहे. कारण आज सकाळी कर्नाटकला (Karnataka) जाणाऱ्या एसटी बसला (ST Bus) काळे फासण्याची घटना ताजी असतानाच, आता मनसेकडून (MNS) देखील शहरातील कर्नाटक बँकेच्या (Karnataka Bank) फलकावर काळे फासण्यात आले आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये सीमावादच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. 


कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादावरून मनसेचे कार्यकर्ते राज्यभरातून आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये सुद्धा मनसेकडून आंदोलन करण्यात आले आहे. शहरातील समर्थनगरमधील भागातील कर्नाटक बँकच्या फलकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. 


शहरातील वातावरण तापले...


कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादावरून गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. दरम्यान काल बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आल्याने याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर औरंगाबादमध्ये यावरून राजकीय वातावरण तापले आहे. आज सकाळी युवा सेनेकडून मध्यवर्ती बसस्थानकात असलेल्या कर्नाटक राज्यातील बसला काळे फासण्यात आले. यावेळी बसवर भगव्या रंगात जय महाराष्ट्र देखील लिहण्यात आले. तर आता मनसेकडून कर्नाटक बँकेच्या फलकाला काळे फासण्यात आले आहे. त्यामुळे सीमावादावरून औरंगाबाद शहारतील वातावरण देखील तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. 


मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात... 


बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आल्याच्या निषेधार्थ मनसे आक्रमक झाली आहे. औरंगाबादच्या समर्थनगरमधील भागातील कर्नाटक बँकच्या फलकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे. दरम्यान याची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव करत मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तसेच काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्यावर कायदेशीर कारवाई पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता आहे. 


मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया...


बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत माझी काल चर्चा झाली आहे. तसेच महाराष्ट्राच्या गाड्यांवर दगडफेक करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याबाबत त्यांना सांगितले आहे. तसेच त्यांनी देखील कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन्ही राज्यातील सीमेवरील नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत सुद्धा त्यांच्यासोबत चर्चा झाली असून, काल जे घडलं ते पुन्हा होणार नसल्याचं शिंदे म्हणाले. 


सीमा वादाचे पडसाद औरंगाबादमध्ये, युवा सेना आक्रमक; कर्नाटकच्या बसला काळं फासले