Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात (Aurangabad City) दुचाकी चोरीच्या (Bike Theft) घटनेत वाढ होतांना पाहायला मिळत आहे. शहरातील महत्वाच्या ठिकाणी उभा केलेल्या दुचाकी चोरट्यांचा रडारवर असल्याचे दिसत आहे. दरम्यान आता चोरट्यांनी आपला मोर्चा शहरातील मॉल्सच्या पार्किंगकडे (Malls Parking) वळवला असल्याचे दिसून येत आहे. कारण शहरातील तीन ठिकाणी मॉल्सच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 


शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांसाठी आता मॉल्सच्या पार्किंग चोरीचा अड्डा बनू लागला आहेत. पोलिसात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात उल्लेख केल्याप्रमाणे प्रोझोन मॉलसमोरून दोन आणि शहानूरमियाँ दर्गा परिसरातील डी मार्टच्या अंडरग्राऊंड पार्किंगमधून एक अशा तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. शहरात गेल्या काही दिवसांत मॉल्सचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते. याचाच फायदा घेत आता चोरट्यांनी मॉल्सच्या पार्किंगला आपले लक्ष केले आहे. 


अशा घडल्या चोरीच्या घटना...


नामदेव तुकाराम बेंद्रे (48,रा. अयोध्यानगर, सिडको) यांनी 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास प्रोझोन मॉलसमोर दुचाकी (एमएच 20 डीजी-8532) उभी केली होती. अवघ्या अर्ध्या तासात चोराने दुचाकी लांबविली. यासोबतच गणेश वसंत देवरे (वय 32 वर्षे, रा. न्यू मधुबन सोसायटी, सिडको) यांनीदेखील 2 डिसेंबर रोजी दुपारी साडेपाचच्या सुमारास प्रोझोन मॉलसमोर दुचाकी (एमएच-41 एएल 8663) उभी करून मॉलमध्ये ड्युटीसाठी गेले होते. चोराने दुचाकी हॅण्डल लॉक तोडून त्यांची दुचाकी लांबविली. तसेच सूरज भगवान इंगळे (वय 25 वर्षे, रा. जयभवानीनगर, जुना मोंढा) यांनी 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शाहनूरमियाँ दर्गा भागातील डी मार्टच्या अंडरग्राउंड पार्किंगमध्ये दुचाकी (एमएच- 20 ईक्यू-5132) उभी केली होती. चोराने अवघ्या अर्ध्या तासात दुचाकी हॅण्डल लॉक तोडून लांबविली. 


पोलिसांसमोर आवाहन...


गेल्या काही दिवसांपासून शहर आणि ग्रामीण भागात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शहरातील महत्वाच्या ठिकाणी दुचाकी उभी केल्यास कधी गाडी चोरीला जाईल याचा अंदाज नाही. तर ग्रामीण भागातील बाजाराचे गाव असलेल्या मोठ्या गावातून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. विशेष म्हणजे अनेकदा चोरी गेलेल्या दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडून चोरी केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुचाकीस्वार यांची चिंता वाढली असून, चोरट्यांना बेड्या ठोकण्याचे पोलिसांसमोर आवाहन निर्माण झाले आहे.  


सीमा वादाचे पडसाद औरंगाबादमध्ये, युवा सेना आक्रमक; कर्नाटकच्या बसला काळं फासले