Teachers Protest In Aurangabad : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जिल्हा परिषद शिक्षक आणि भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच आता शिक्षकांनी आमदार बंब यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असून, आज (11 सप्टेंबर) औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यलयावर भव्य असा मोर्चा काढला जात आहे. शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत बंब यांनी केलेल्या मागणीच्या विरोधात हा मोर्चा निघत आहे. विशेष म्हणजे या मोर्च्याचे नेतृत्व शिक्षक-पदवीधर आमदार करणार आहे.  


जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याने मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा आरोप आमदार बंब यांनी केला आहे. तर मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा बंब यांनी केली आहे. त्यामुळे बंब यांच्याविरुद्ध आज औरंगाबाद येथे शिक्षक संघटनांकडून भव्य असा मोर्चा काढला जात आहे. या मोर्च्यात औरंगाबादसह इतर जिल्ह्यातील शिक्षक सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 


असा असणार मोर्चा 


या सर्व मोर्च्याचे नेतृत्व शिक्षक आमदार कपिल पाटील, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे आणि आमदार सुधीर तांबे हे करणार आहे.  तर औरंगाबादच्या आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालय असा भव्य मोर्चा असणार आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात येईल. या मोर्च्यात राज्यभरातील शिक्षक उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांकडून दावा करण्यात आला आहे. 


यामुळे निघतोय मोर्चा...


याबाबत बोलतांना शिक्षक आमदार विक्रम काळे म्हणाले की, आज आमखास मैदानापासून ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य असा मोर्चा काढला जाणार आहे. गेल्या विधानसभा अधिवेशनात आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याबाबत जे काही विधान केले आहेत त्याचा निषेध आणि शिक्षकांचा सन्मान यासाठी हा मोर्चा काढला जात असल्याचं आमदार काळे म्हणाले आहेत. 


पोलिसांचा तगडा बंदोबस्त...


आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक यांच्यातील गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला वाद पाहता पोलिसांनी या मोर्च्यासाठी तगडा बंदोबस्त लावला आहे. मोर्च्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा औरंगाबादमध्ये एकदा शिक्षक मोर्च्यात राडा झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागल्याचा इतिहास आहे. त्यामुळे पोलिसांकडून मोर्च्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन केले जात आहे.


महत्वाच्या बातम्या...


Prashant Bamb Vs Teachers: आमदार प्रशांत बंब यांचा शिक्षकांवर एवढा राग का आहे?; वाचा सविस्तर...


Aurangabad: 'त्या' शिक्षकांचे मासिक वेतनच थांबवा; आमदार प्रशांत बंब यांची आता नवीनच मागणी