Aurangabad News: भाजप आमदार प्रशांत बंब यांनी पावसाळी अधिवेशनात जिल्हा परिषदेचे शिक्षक मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि नवीन वादाला तोंड फुटले. आता महिना उलटला असतानाही हा वाद काही मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. त्यातच आमदार प्रशांत बंब रोज नवनवीन आरोप करत शिक्षकांवर कारवाईची मागणी करत आहे. राज्यातील अनेक शासकीय कर्मचारी आणि अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसतांना आमदार बंब हे फक्त उठसुठ शिक्षकांवरच आरोप करत आहे. त्यामुळे आमदार प्रशांत बंब यांचा शिक्षकांवर एवढा राग का आहे? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. 


जिल्हा परिषद शिक्षकांनी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याची मागणी आमदार बंब यांनी केली आहे. तर दुसरीकडे अनेक गावात राहण्यासाठी घरचं उपलब्ध होत नसल्याने आधी शिक्षकांना राहण्यासाठी शासकीय निवास्थान उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यासह अनेक जण शासकीय कर्मचारी आणि अधिकारी नोकरी करतात. मात्र फक्त शिक्षकांनीच मुख्यालयाच्या ठिकाणी राहावे अशी आमदार बंब यांनी घेतलेल्या भूमिकेवर शिक्षकांनी संशय व्यक्त केला आहे. बंब हे फक्त शिक्षकांना टार्गेट करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. 


फक्त शिक्षकचं का? 


गेल्या महिन्याभरापासून आमदार बंब यांनी शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याचा मुद्दा लावून धरला आहे. सुरवातीला त्यांनी शिक्षकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याची मागणी केली. त्यानंतर शिक्षक-पदवीधर मतदारसंघ बंद करण्याची मागणी केली. त्यातच आता मुख्यालयाच्या ठिकाणी जोपर्यंत शिक्षक राहत नाही तोपर्यंत त्या संबधित शिक्षकाचे मासिक वेतन थांबवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या इतर शासकीय कर्मचाऱ्यांवर न बोलता फक्त बंब शिक्षकांवरच का आरोप करत आहेत? असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे.   


सरकराने भूमिका स्पष्ट करण्याची गरज...


भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांचा मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याचा मुद्दा उपस्थित केल्याने, राज्यभरातील शिक्षकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. त्यात बंब आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. तसेच उद्या शिक्षकांनी भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमदार बंब आणि शिक्षक यांच्यातील वाद आणखीनच वाढत आहे. त्यामुळे सरकारने याबाबत आता आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. अन्यथा हा वाद आणखीच तापण्याची शक्यता आहे.