Marathwada Water Issue: जेव्हाजेव्हा मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र (Marathwada Vs Western Maharashtra) असा वाद समोर येत असतो. मराठवाड्यातील जनतेला पाणी मिळावे म्हणून नाशिक जिल्ह्यात धरणे बांधली गेली, मात्र पाणी सोडतांना नेहमीच मराठवाड्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. दरम्यान भाजपचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांनी आज अधिवेशनात पुन्हा एकदा याच मुद्यावरून प्रश्न उपस्थित करत, मराठवाड्यासाठी नाशिकमध्ये चार धरणं बांधूनही पाणी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. 


काय म्हणाले बागडे...


विधानसभेत बोलतांना हरिभाऊ बागडे म्हणाले की, मराठवाड्यातील जनतेला पाणी मिळावे म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये चार धरणं बांधली गेली. ही धरणं केवळ मराठवाड्यासाठी बांधली. पण त्या चारही धरणातील पाणी कधीच फारसं मराठवाड्याला मिळाले नाही. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की, आता समृद्धी महामार्गाच्या बाजूने आपण जर असचं एक पाईपलाईनने पाणी केले तर, प्राधान्याने पाणी पोहचेल आणि त्यासाठी पंपिंग करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे मराठवाड्यातील अगदी वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद आणि पुढे जालनापर्यंत प्राधान्याने पाणी जाऊ शकते. म्हणून असा हा नवीन प्रकल्प सरकार विचारत घेणार आहे का? असा प्रश्न बागडे यांनी उपस्थित केला आहे. 


बागडेंना उपमुख्यमंत्री यांचे उत्तर...


बागडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हरिभाऊ बागडे यांनी खूप महत्वाचा विषय लक्षात आणून दिला आहे. त्यामुळे जरूर या संदर्भात पडताळणी करण्यात येईल. तसेच त्यांनी जे सांगितले ते शक्य असेल तर ते घेण्यात येईल असं फडणवीस म्हणाले.


मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र जुना वाद...


नेहमी दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या मराठवाड्यातील पाणी प्रश्न काही नवीन नाही. मात्र हाच दुष्काळ दूर व्हावा म्हणून नशिक जिल्ह्यात मराठवाड्यासाठी चार धरणं बांधण्यात आली आहे. पण मराठवाड्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यावर पश्चिम महराष्ट्रातील याच धरणातून पाणी सोडण्यात येत नाही. तसेच दुष्काळ परिस्थितीत वरील धरणातून पाणी सोडल्यावर जायकवाडीत (jayakwadi dam) पाणी येईपर्यंत पश्चिम महराष्ट्रातील शेतकरी पाणी वळून घेत असल्याचा आरोपही नेहमी केला जातो. त्यामुळे दोन्ही भागातील राजकीय नेत्यांमध्ये यावरून वाद पाहायला मिळते. याप्रकरणी अनेकदा नेतेमंडळी थेट न्यायालयात सुद्धा गेल्याचे पाहायला मिळाले. 


महत्वाच्या बातम्या...


Ajit Pawar : राज्यात 45 दिवसात 137 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अजित पवारांचा सरकारवर निशाणा, अब्दुल सत्तारांनी पवारसाहेबांचं मार्गदर्शन घ्यावं


'किती नर आणि किती मादी डास सापडले?' आधी अजित पवार आता छगन भुजबळांकडून आरोग्यमंत्र्यांची फिरकी