Aurangabad News: 'जी-20’साठीचे परदेशी पाहुणे औरंगाबादला येणार असल्याने औरंगाबाद प्रशासन कामाला लागले आहे. दरम्यान औरंगाबाद महापालिकेच्यावतीने (Aurangabad Municipal Corporation) मंगळवारी ऐतिहासिक वारसास्थळांकडे (Historical Heritage Site) जाणाऱ्या रस्त्यांवर अतिक्रमण हटावची मोहीम राबवण्यात आली आहे. बीबी का मकबरा ते पानचक्की व पानचक्की ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) या रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणे महानगरपालिकेच्या पथकाकडून हटविण्यात आली.


औरंगाबाद महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत मंगळवारी प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा स्थळ असलेले बीबी का मकबरा ते पानचक्की व पाणचक्की ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ रस्त्याकडे जाणाऱ्या आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणधारकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. काही नागरिकांनी रस्त्याच्या मधोमध सिमेंटचे ओटे बांधून लोखंडी टपऱ्या टाकल्या होत्या. तर काहींनी मकबरा  समोरील भागात दहा बाय पंधरा,  या आकाराच्या जागेत अतिक्रमणे केली होती. त्यामुळे ही अतिक्रमणे हटविण्यात आली असून, साहित्य जप्त करण्यात आले आहे. 


रस्ता पूर्णपणे मोकळा केला... 


सोबतच मिल कॉर्नर ते बारा पुल्ला गेट ते विद्यापीठ रस्ता या ठिकाणी काही नागरिकांनी आपल्याकडील चार चाकी वाहन जसे की, क्रेन रोलर आणि इतर खराब झालेल्या चार चाकी रस्त्यावर लावल्या होत्या. या सर्व  गाड्या काढून रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला. लेणी रस्त्यावर काही नागरिकांनी बांधकाम साहित्य टाकल्याने सतत अपघात होत होते. त्यामुळे या ठिकाणी देखील प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.


डाव्या बाजूने जाणाऱ्या वाहनांचा अडथळा दूर... 


तसेच शहरातील डाव्या बाजूने जाणाऱ्या वाहनांना अडथळा होऊ नये म्हणून शहागंज मंजूरपुरा, चेलीपुरा, राजा बाजार येथील टपऱ्याचे व शेडचे अतिक्रमण काढण्यात आले. सदर कारवाई दररोज शहरात होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी आपल्या रस्त्यावरच्या अतिक्रमण स्वतः काढून घ्यावे नसता जेसीबीच्या साह्याने ते काढण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी महानगरपालिकेच्या वतीने आवाहन केले आहे. 


आयुक्तांची पाहणी...


आगामी जी 20 (G-20) परिषदेच्या पार्श्वभूमीवर शहरातील दिल्ली गेट ते जळगाव हायवे मार्गे, चिकलठाणा विमानतळ ते बाबा पेट्रोल पंप हा रस्ता गुळगुळीत करण्याबाबत महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी पाहणी केली. यावेळी सदरील रस्त्याचे पॅचवर्क, रस्त्यावर दुभाजक रंगरंगोटी व सौंदर्यकरण, परिषदेसाठी येणारे सदस्यांसाठी स्वागत फ्लेक्स आणि बॅनर्स, ग्रीन बेल्ट विकसित करणे, फुटपाथ सुशोभीकरण, आकर्षक रोषणाई आणि उड्डाणपूलांची सौंदर्यकरण व सुशोभीकरण तसेच वीज खांबांचे सौंदर्यकरण कसा करता येईल याबाबत चर्चा करत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 


पाच मंत्री असलेल्या औरंगाबादच्या रस्त्यांचे प्रशांत दामलेंनी काढले वाभाडे, केली फेसबुक पोस्ट