Aurangabad News: राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण (NCP MLA Satish Chavan) यांच्यावर गंभीर आरोप करत नाराजी व्यक्त करणारे वैजापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर (Bhausaheb Chikatgaonkar) यांनी अखेर हातातील घड्याळ काढून ठाकरेंची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. चिकटगावकर यांचा आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. तर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चिकटगावकर पक्षात नाराज होते आणि याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उघडपणे खुलासा केला होता.
वैजापूर तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आणि आमदार सतीश चव्हाण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पक्षअंतगर्त वाद सुरु होता. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत वैजापूर येथील काँग्रेसच्या ठोंबरे गटाला राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला होता. मात्र या प्रवेशाला चिकटगावकर यांनी विरोध केल्याने अनेकदा हा प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. परंतु सतीश चव्हाण यांच्या पुढाकाराने अखेर गेल्या महिन्यात हा प्रवेश सोहळा पार पडला होता. त्यामुळे नाराज असलेल्या चिकटगावकर यांनी अखेर राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सतीश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप...
काही दिवसांपूर्वी भाऊसाहेब चिकटगावकर यांनी वैजापूर येथे पत्रकार परिषदेत सतीश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार आहेत त्याठिकाणी निवडणुकीच्या पूर्वी पक्षात वेगळा गट तयार करण्याचे काम आमदार चव्हाण करतात. त्यानंतर निवडणूक लागताच त्या गटाला विरोधी पक्षात पाठवून आपल्याच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडण्याचे काम चव्हाण यांच्याकडून सुरू आहे. पैठण आणि कन्नड तालुक्यात त्यांनी असाच प्रयोग केला असून, आता वैजापूरमध्ये तसाच काही प्रकार करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप चिकटगावकर यांनी केला होता. तर हे सर्व आरोप चव्हाण यांनी फेटाळून लावले होते.
रमेश बोरनारेंची चिंता वाढणार...
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे शिंदे गटात गेले. मात्र तालुक्यातील शिवसेनेचा एक मोठा गट उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिला. ठाकरे गटाकडून बोरनारे यांना अनेकदा विरोध झाला. काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने आले होते. त्यातच आता चिकटगावकर यांच्या प्रवेशाने ठाकरे गटाची ताकद आणखी वाढणार आहे. त्यामुळे याचा फटका बोरनारे यांना बसू शकतो अशी चर्चा पाहायला मिळत आहे.