Aurangabad Road News: राज्यात सर्वाधिक मंत्री लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) रस्त्यांची अवस्था गंभीर असून, अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे पाहायला मिळतात. दरम्यान अशाच एका रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या सुप्रसिद्ध मराठी नाट्य व चित्रपट अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी उपहासात्मक टीका करत अक्षरशः औरंगाबादच्या विकासाचे वाभाडे काढले आहे. प्रशांत दामले यांनी औरंगाबाद वैजापूर प्रवासादरम्यान आलेला अनुभव आपल्या फेसबुक पेजवरून (Facebook Page) शेअर करत खोचक फटकारे लावले आहे. 


मराठी नाट्य व चित्रपट अभिनेते प्रशांत दामले हे दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील संत एकनाथ रंगमंदिरात 'एका लग्नाची पुढची गोष्ट' नाटकाच्या प्रयोगासाठी आले होते. नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर ते औरंगाबादेतून नाशीककडे (Aurangabad To Nashik) प्रयोग करण्यासाठी शिऊर बंगल्यामार्गे निघाले होते. मात्र या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांचा सामना करत त्यांना प्रवास करावा लागला. त्यामुळे त्यांनी या प्रवासादरम्यान वाहनातूनच औरंगाबाद-वैजापूर महामार्गाच्या रस्त्याचा व्हिडिओ शूट करत आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. सोबतच उपहासात्मक टीकाही केली आहे. 


प्रशांत दामलेंची फेसबुक पोस्ट...


प्रशांत दामले यांनी फेसबुक पोस्ट केली असून ज्यात, "आज संभाजीनगरचे दोन्ही प्रयोग खणखणीत झाले. रसिकांना धन्यवाद....! अतिशय स्वादिष्ट पण थंड जेवण आनंदाने जेवलो. (कँटिन बंदच आहे म्हणून) मग निघालो. औरंगाबाद वैजापूर रस्ता असा आहे. त्यामुळे जेवण आपोआप पचलं." असा उपहासात्मक टीका करत त्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.



रस्त्यांची दुरवस्था...


औरंगाबाद- वैजापूर महामार्गावरील रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे की, पायी चालणे देखील अवघड आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था या महामार्गाची झाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या कामाची मागणी स्थानिकांकडून केली जाते. मात्र नेत्यांच्या आश्वासनाच्या पलीकडे यात कोणतेही प्रगती होत नसल्याचा अनुभव आता वाहनधारकांसाठी नेहमीचा झाला आहे. 


पाच मंत्र्याचा जिल्हा... 


औरंगाबाद जिल्ह्याला राज्याचे तीन कॅबिनेट आणि केंद्राचे दोन राज्यमंत्री लाभले आहे. त्यामुळे औरंगाबादच्या विकासात मोठी भर पडेल अशी औरंगाबादकरांची अपेक्षा आहे. मात्र त्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अपेक्षित प्रयत्न होत नसल्याचे सद्याचे चित्र आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. वाहनधारकांना मोठी कसरत करून प्रवास करावा लागत आहे. पण असे असतांना रस्त्यांचे रुपडं काही बदलताना दिसत नसल्याचे चित्र आहे.