Aurangabad Rain: गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील टाकळी अंबड परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या जोरदार पावसामुळे शेतात पाणी तुंबले आहे. यामुळे आता उरले-सुरले पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 


पैठणच्या टाकळी अंबड परिसरात मागील आठवड्यापासून कधी रिमझिम तर कधी जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान गुरुवारी रात्री अचानक वातावरणात मोठा बदल झाला आणि जोरदार पावसाने हजेरी लावली. तर टाकळी अंबडसह आपेगाव, नवगाव, तुळजापूर, रामनगर, हनुमाननगर, विठ्ठलनगर, आवडे उंचेगाव, घेवरी, हिरडपुरी, विहामांडवा भागात गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश मोठा पाऊस झाला. विशेष म्हणजे रात्री 11 ते पहाटे तीन वाजेपर्यंत चार तास पाऊस जोरदार कोसळत होता. 


पिकांचं मोठं नुकसान...


ढगफुटीसदृश पावसामुळे सर्वच ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी झाले. तर या जोरदार पावस्मुळे कपाशी, ऊस, तूर, मूग, सोयाबीन, फळबाग आदी पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजेच आधीच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत असतानाच परतीच्या पावसामुळे उरल्यासुरल्या पिकांचेही नुकसान झाल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. 


शेतात तुंबले पाणी...


गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरु असलेल्या पावसामुळे जिकडे-तिकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. तर शेतात अजूनही पाणी तुंबलेले आहे. पावसाने नदी, नाले, ओढे, तलाव ओसंडून वाहू लागले असून, तोडणीसाठी आलेल्या शेतातील उसाचे तसेच कपाशी, तूर, मूग, मका, सोयाबीन भाजीपालासह फळबाग लागवड केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच कापूस वेचणीला आला असतानाच जोरदार पावसामुळे कापसाचे बोंडे ओले झाले आहे. या कापसाला घरात साठवून ठेवता येत नाही आणि दरही कमी मिळतो. म्हणून याचा मोठा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे महसूल, कृषी विभागाने त्वरित नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Marathwada Rain: मराठवाड्यातील 14 मंडळांमध्ये अतिवृष्टी, आज-उद्या येलो अलर्ट


Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाचे पुन्हा 18 दरवाजे उघडले, पाण्याची आवकही वाढली