Aurangabad News : गणेश विसर्जनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे दुसऱ्यांदा औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात त्यांनी औरंगाबादचा दोन दिवसीय दौरा केला होता. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे 12 सप्टेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिंदे गटाकडून त्यांच्या दौऱ्याची तयारी सुद्धा करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. 


याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे 12 सप्टेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ते रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहे. दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही सभा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संदिपान भुमरे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर आणि कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मतदारसंघात येत आहे. त्यामुळे भुमरे यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याची चर्चा आहे. 


सभेला प्रचंड गर्दी होणार: भुमरे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठण दौऱ्याबाबत बोलतांना संदिपान भुमरे म्हणाले की, गणेशोत्सव झाल्यावर दोन-तीन दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा राहणार असून, त्यावेळी विरोधकांना  दिसेल पैठण तालुका कुणाच्या पाठीशी आहे. पैठणमध्ये गेल्या तीस वर्षात न भूतो न भविष्यती अशी सभा झाली असेल अशी सभा होईल असे भुमरे म्हणाले.  


यापूर्वी झाली होती आदित्य ठाकरेंची...


शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीनंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिव संवाद यात्रा काढली होती. यावेळी त्यांची हीच यात्रा भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात सुद्धा काढण्यात आली होती. ज्यात आदित्य ठाकरेंना मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे त्यावेळी भुमरे यांच्यावर टीकाही झाली होती. 


मोठी बातमी: फक्त आमदारचं नव्हे मराठवाड्यातील शिवसेनेचे 80 टक्के जिल्हाप्रमुखही संपर्कात; भुमरेंचा दावा


विरोधकांना शक्तिप्रदर्शनातून उत्तर...


आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्याने पैठण तालुक्यातील शिवसैनिकांना भुमरे यांची बंडखोरीची भूमिका पटली नसल्याची चर्चा झाली. त्यातच गेल्या आठवड्यात त्यांच्या एका कार्यक्रमात मोठ्याप्रमाणावर खुर्च्या खाली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने भुमरे पुन्हा एकदा ट्रोल झाले. त्यामुळे या सर्व परिस्थितीत विरोधकांना उत्तर देण्यासाठी भुमरे यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेचे पैठणमध्ये आयोजन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर याच सभेतून जोरदार शक्तिप्रदर्शन करत भुमरे विरोधकांना उत्तर देण्याची तयारी करत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.