Aurangabad Crime News: औरंगाबादच्या शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजाची विक्री करण्‍यासाठी आलेल्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. यावेळी पोलिसांनी आरोपींच्‍या ताब्यातून तब्बल 34 किलो गांज्यासह इनोव्हा कार असा सुमारे 11 लाख 30 हजार रुपये किंमतीचा ऐवज हस्‍तगत करण्‍यात आला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदारामार्फत बेगमपुरा पोलिसांना माहिती मिळाली होती की, अम्रपाली नगर विद्यापीठ गेट समोर काही लोकं इनोव्हा कारमध्ये गांजा विक्रीसाठी आणणार आहेत. त्यावरुन वरिष्ठांच्या परवानगीने अम्रपाली नगर विद्यापीठ गेटसमोर पोलिसांच्या पथकाने फॉरेंन्सीक एक्सपर्ट टीमसह सापळा लावला. मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथक इनोव्हा कारची वाट पाहत असतानाच एक इनोव्हा येतांना त्यांना पाहायला मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ छापा मारला. 


हे आहेत आरोपी...


पोलीस पथकाने गाडी अडवून छापा टाकण्याचा प्रयत्न करताच त्यातील आरोपींनी गाडी थांबून, पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी, सुरेश रावसाहेब सागरे ( वय- 24 वर्षे, धंदा- ड्रायवर, रा. सुरेवाडी, औरंगाबाद), सागर भाऊसाहेब भालेराव (वय- 25 वर्षे, रा. वाघलगाव, ता. फुलंब्री), संदेश दिलीप ठाकुर (वय- 24 वर्षे, रा. मयुरपार्क औरंगाबाद) , शंकर भीमराव काकडे (वय- 24 वर्षे, रा. अम्रपाली नगर, विद्यापीठ गेट समोर औरंगाबाद) असे नावं सांगितले. 


आरोपींना 5 सप्‍टेंबरपर्यंत पोलिस कोठडी


चौघांना ताब्यात घेतल्यावर गाडीची तपासणी केली असता, तब्बल 4 लाख 8 हजार 228  रुपये  किंमतीचा 34 किलो गांजा आढळून आले. सोबतच 7 लाखांची इनोव्हा कार (क्रं. MH 20 CS 6777 ), बावीस हजारांचे 4 मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 11 लाख 30 हजार रुपये किंमतीचा ऐवज मिळून आला. याप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध बेगमपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपींना न्‍यायालयात हजर केले असता,  आरोपींना 5 सप्‍टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


यांनी केली कारवाई...


बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, पो.उपनिरिक्षक विनोद भालेराव. पो.उपनिरीक्षक विशाल बोडखे, पो. नाईक हैदर शेख, सोनवणे, कचरे, एखंडे, पो.अ. ज्ञानेश्वर ठाकुर, विजय निकम, शरद नजन, चव्हाण, मुरकुटे यांनी ही कारवाई केली आहे.


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी वाजवण्यावर बंदी; औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडून 144 चे आदेश


Aurangabad: पोलिसांची दुचाकी चोरांविरोधात मोठी कारवाई; गुन्ह्यातील 6 मोटारसायकल जप्त