Aurangabad: खोके घेऊन बंडखोरी करण्याचा आरोप झालेल्या आमदारांची 'ईडी'ची चौकशी कधी होणार: चंद्रकांत खैरे
Aurangabad News: संजय राऊत यांना कमकुवत करण्याचा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा आरोप खैरे यांनी केला.
Sanjay Raut Arrested: तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर अखेर संजय राऊत यांना ईडीकडून रात्री अटक करण्यात आली आहे. त्यांनतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेनेच्या नेत्यांच्या संतप अशा प्रतिक्रिया समोर येत आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा 'ईडी'च्या कारवाईवरून भाजपवर निशाणा साधला आहे. बंडखोरी करण्यासाठी खोके मिळाले असल्याचा ज्यांचावर आरोप झालेला आहे, अशा 40 आमदारांची 'ईडी'ची चौकशी कधी होणार असा सवाल खैरे यांनी उपस्थित केला आहे.
एबीपी माझाला फोनवरून प्रतिक्रीया देतांना खैरे म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी असे कट कारस्थान केले आहे. झारखंडमध्येही काँग्रेस आमदारांना दहा कोटींची ऑफर देण्यात येत आहे. गुवाहाटीला ज्या 40 आमदारांना घेऊन गेले होते, त्यांना सुद्धा खोके मिळाले असल्याचं म्हणतात. पण त्यांच्यावर ईडी वैगरे लागत नाही का?, त्यांना कुणी आणून दिले, कुणी खर्च केला. संजय राऊत यांना कमकुवत करण्याचा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा आरोप खैरे यांनी केला.
आणीबाणीत काय झालं...
कधीकाळी भाजपचे अटल बिहारी हे 23 पक्षांना सोबत घेऊन काम करत होते. आज ते नाहीत, त्यामुळे यांना आज फक्त यांचाच एकमेव पक्ष पाहिजे. ज्याप्रमाणे शिवसैनिकांवर, शिवसेनेच्या नेत्यांवर आणि आमच्या संघटनेवर बुलडोझर फिरवण्याचा काम सुरु आहे, ते आम्ही हाणून पाडणार आहोत. आणीबाणीत काय झालं होतं जनतेची लाट आली आणि देशात जनता राज आले होते. पण आज हे अशाप्रकारे वागायला लागले, सूड बुद्धीने वागायला लागेल असून, त्यांना परमेश्वर कधीही माफ करणार नसल्याचं खैरे म्हणाले.
शिवसेनेकडून निदर्शने...
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. आज औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून जोरदार निदर्शने केले जाणार आहे. शहरातील क्रांती चौकात आज शिवसेना, युवा सेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून निदर्शने केली जाणार आहे. राऊत यांच्यावर राजकीय हेतून कारवाई करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. त्यामुळे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थित ही निदर्शने केली जाणार आहे.