Chandrakant Patil: राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर काल पुण्यात (Pune) शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकप्रकरणी भाजप (BJP) आक्रमक होण्याची शक्यता असून, भाजप कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) क्रांती चौकात आज दुपारी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.
महापुरुषांबद्दल केलेल्या एक वक्तव्यावरुन राज्यभरात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. तर काही ठिकाणी चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. दरम्यान काल पुण्यात एका पदाधिकाऱ्यांच्या घरी असताना त्यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी शाईफेक करणाऱ्या व्यक्तिला लगेच ताब्यात घेतले होते. मात्र आता यावरून भाजपकडून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार आहे.
भाजपकडून आंदोलन...
औरंगाबादचे भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी दीड वाजता शहारतील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भाजपकडून आंदोलन केले जाणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर काल पुण्यात करण्यात आलेल्या शाईफेकीच्या घटनेच्या विरोधात हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण...
औरंगाबाद दौऱ्यावर असतांना पैठणच्या संत पीठाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी भाषण करतांना कर्मवीर भाऊराव पाटील, डॉं. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी भीक मागून शाळा चालवल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. यावरून राज्यभरात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान काल पुण्यात असतांना चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर समता सैनिक दलाचे मनोज घरबडे याने शाईफेक केली होती. त्यानंतर उपस्थित पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली होती.
चंद्रकांत पाटील यांच्याकडून दिलगिरी...
कर्मवीर भाऊराव पाटील, डॉं. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी भीक मागून शाळा चालवल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तर आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचं पाटील म्हणाले आहे. मात्र तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.
Chandrakant patil : चंद्रकांत पाटलांवर पुण्यात शाईफेक; शाई फेकणारा ताब्यात, आंदोलक आक्रमक