Chandrakant patil Latest News : महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil ) यांना काळे झेंडे दाखवून (Black flag) ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या घरी असताना त्यांच्या अंगावर शाई फेक करण्यात आली. एका कार्यकर्त्याच्या घरुन निघत असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर अचानक एका व्यक्तिनं शाई फेकली. यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तिला लगेच ताब्यात घेतलं. चंद्रकांत पाटील मुर्दाबाद अशी घोषणाबाजी देखील यावेळी शाई फेकणारा व्यक्ती करत होता. त्या व्यक्तिचं नाव अद्याप समजलेलं नाही. श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटन समाधीसाठी चिंचवड गावात आले होते, त्यावेळी त्यांना हे काळे झेडे देखील दाखवण्यात आले. 


चंद्रकात पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे विद्यार्थी (NSUI) आक्रमक झाले होते. महापुरुषांबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्यावरुन कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील मुर्दाबाद अशा घोषणा करत भर रस्त्यात त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीबा फुले यांचे फोटो हातात घेतले होते. ते फोटो दाखवत त्यांना काळे झेंडे देखील दाखवले. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. वेगवेगळ्या शहरात कॉंग्रेसकडून निषेध व्यक्त केला जात आहे.


पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त
चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमादरम्यान होणाऱ्या संभाव्य गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यासाठी ते राहणार उपस्थित आहेत.  महापुरुषांबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे कार्यक्रमात गोंधळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या घराजवळ पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. असं असतानाही चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर एका व्यक्तिनं शाईफेक केली.



"भिकेमध्ये मिळालेला कोथरूड मतदार संघ"; कॉंग्रेसकडून बॅनरबाजी
चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बॅनर लावण्यात आले आहेत. पुण्यातील कोथरुड  भागात लावण्यात आले आहेत. "भिकेमध्ये मिळालेला कोथरूड मतदार संघ" असा उल्लेख या बॅनरमध्ये करण्यात आला आहे. यावर काळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडमध्ये त्यांचा कार्टूनसारखा फोटो बॅनरवर लावण्यात आलं आहे. शहरात कोथरुड भागातच नाही तर इतर भागात देखील असे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. 


राज्यात ठिकठिकाणी निषेधार्थ आंदोलन
 चंद्रकांत पाटलांविरोधात राज्यभर ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला गेला. औरंगाबादमध्ये वंचितच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. नांदेडमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचा अंत्यविधी करण्यात आला. अमराबती शहरात त्यांचे पोस्टर जाळण्यात आले. धुळ्यातील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रार अर्ज  दाखल करण्यात आला. सोलापुरात आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या बघायला मिळाल्या.