Aurangabad Crime News: पत्नीच्या माहेरी येऊन तिच्या मर्जीच्या विरोधात शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केल्याचा आरोप केल्याने पतीविरोधात औरंगाबादच्या (Aurangabad) सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीसह सासरच्या लोकांकडून सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत असल्याने काही दिवसांपासून विवाहिता माहेरी राहत होती. दरम्यान पतीने आपल्या माहेरी येऊन आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केल्याने पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. 


सिल्लोड येथील आव्हाना रोड परिसरात राहणाऱ्या एका सव्वीस वर्षीय विवाहित महिलेने सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,तिचा विवाह औरंगाबादेतील बायजीपुरा येथे विवाह पार पडला. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. या संदर्भात महिलेन मनमाड येथे फिर्यादही दिली आहे. 


तेव्हापासून ती सिल्लोड येथे वडिलांच्या घरी राहू लागली. 4  डिसेंबर रोजी ती घरी एकटीच होती. याच दरम्यान पती रात्री तिच्या माहेरच्या घरी आला. शिविगाळ करत व जिवे मारण्याची धमकी देत त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध प्रस्थापीत केल्याची तक्रार महिलेने दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी पीडितेच्या पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


Aurangabad Crime: चाकूने स्वतःचा गळा चिरून घेत वृध्दाची आत्महत्या; परिसरात खळबळ


अल्पवयीन मुलीवर अत्याचार


दुसऱ्या एका घटनेत अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी तिघांविरोधात अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलगी हरवल्याची तक्रार तिच्या आईने 11 नोव्हेंबरला अजिंठा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून अल्पवयीन मुलीस गुजरातमधील राजकोटमधून शोध घेऊन ताब्यात घेतले होते. तर संबधीत मुलीला महिला अंमलदारामार्फत पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता राजकोट येथे तिच्यावर एकाने अत्याचार केल्याचे समोर आले. राहुल दिलीप निभोरे (वय 21 वर्षे) असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. घरचे मनाविरुध्द लग्न लावून देणार असल्याने ती पळून गेली होती, असेही मुलीने आपल्या जबाबात म्हटले आहे. 


आई विरोधात देखील गुन्हा दाखल... 


मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, बाळापूर (ता. सिल्लोड ) येथील हॉटेल व्ह्यू पॉइंटचा मालक सलीम मलिक (वय 70) याने तिच्या आईच्या संमतीवरून तिच्याशी जबरदस्तीने अत्याचार केला होता. तर मुलीच्या आईकडून तिच्या मनाविरुध्द लग्न लावून देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे ती पळून गेली होती. मात्र ज्याच्यासोबत पळून गेली त्याने देखील तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे पोलिसांनी राहुल निभोरे, सलीम मलिक यांच्यासह मुलीच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे.