Aurangabad: आजपासून गणेशोत्सवाला सुरवात होत असून, तब्बल दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी गणेश भक्त सज्ज झाले आहे. तर दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून सुद्धा औरंगाबाद शहरात तगडा बंदोबस्त असणार आहे. पुढील दहा दिवस गणेश भक्तांना गणेशोत्सवाचा मनसोक्त आनंद घेता यावा म्हणून पोलिसांचा 24 तास खडा पहारा असणार आहे. यासाठी चौका-चौकात आणि गल्लीबोळात सुद्धा पोलिसांकडून पेट्रोलिंग केली जाणार आहे.


पोलिसांचा तगडा बंदोबस्त....


आज पासून पुढील दहा दिवस साजरा होणारा गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी गणेशभक्तांसोबतच शहर पोलिस दलानेही जोरदार तयारी केली आहे. स्थानिक व बाहेरील पोलिस अधिकारी, कर्मचारी मिळून जवळपास अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला आहे. सोबतच एन्ट्री पॉइंटला तपासणी, फिक्स पॉइंट, छेडछाडविरोधी पथक आणि पायी गस्त राहणार आहे. 


असा असणार बंदोबस्त 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवादरम्यान विसर्जन होईपर्यंत शहरातील मुख्य चौकात 21 ठिकाणी मुख्य फिक्स पॉइंट लावण्यात आलेले आहेत. तसेच पोलिस आयुक्तालयांच्या हद्दीतील 17 पोलिस ठाण्यांतर्गत तब्बल 79 ठिकाणी फिक्स पॉइंट असणार आहे. सोबतच 36  दुचाकीवरून 144  अंमलदार बिट मार्शल पेट्रोलिंग करतील. तसेच शहरातील सर्वच पोलीस ठाण्यातील एकूण 17  पोलिस उपनिरीक्षक, 165  अंमलदार आणि 40  महिला पोलिस शिपाई हे बंदोबस्तासाठी राखीव असणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचप्रमाणे शहरात प्रवेश करणाऱ्या सहा ठिकाणच्या हद्दीवर चेक पोस्ट उभारण्यात आल्या असून, पाच ठिकाणी वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत.


महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष पथक.. 


गणेशोत्सवादरम्यान अनेक महिला,मुली घराबाहेर पडतात. मंडळाकडून सादर केले जाणारे विविध देखावे पाहण्यासाठी सुद्धा महिलांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे यावेळी छेड काढण्यासारखे प्रकार घडतात.  म्हणूनच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रोमिओंविरोधात कारवाईसाठी 17  ठाण्यांच्या हद्दीत दोन सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, 15  महिला सहायक फौजदार, 34  महिला अंमलदार आणि 17  पुरुष अंमलदार तैनात असतील. चार वाहनांतून चार विशेष पथके तैनात असणार आहेत. सोबतच दोन दामिनी पथक असणार आहे. 


महत्वाच्या बातम्या...


PHOTO : शेवग्याचा पाला वापरुन साकारलेली पर्यावरणपूरक गणेश मूर्ती


Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीला 'या' राशींचे भाग्य बदलणार, पूजा करताना करा या गोष्टी