Aurangabad Crime News: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील गेवराई बार्शी येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जमिनीच्या वादातून एका स्वयंघोषित पत्रकार, पोलीस अधिकारी (Police Officer) आणि तहसीलदार (Tehsildar) यांच्याकडून आपल्यावर दबाव आणला जात असून, त्यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या केली असल्याचं सुसाईड नोटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. शेषराव सोमाजी खुटेकर (वय 65 वर्षे, रा.गेवराई बार्शी,ता.पैठण) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. 


याबाबत अधिक माहिती आशी की, शेषराव खुटेकर आणि सुसाईड नोटमध्ये स्वयंघोषित पत्रकार म्हणून उल्लेख केलेल्या मनोज खुटेकर यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद होता. पुढे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने निकाल मनोज खुटेकर यांच्या कुटुंबाच्या बाजूने दिला. त्यानंतर शेषराव खुटेकर यांनी जमिनीची शासकीय मोजणीसाठी अर्ज केला. यासाठी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मागवला होता. मोजणी झाल्यावर शेषराव खुटेकर यांची जमीन मनोज खुटेकर यांच्याकडे निघत असल्याचा दावा शेषराव यांनी केला होता. त्यामुळे गेल्या सात-आठ महिन्यापासून दोन्ही कुटुंबात यावरून वाद सुरु होते. दरम्यान शेषराव खुटेकर यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. 


चार दिवसांपूर्वी झाला होता वाद...


शेषराव खुटेकर आणि मनोज खुटेकर यांची भावकी आहे. वडिलोपार्जित जमिनीवरून हा सर्व वाद सुरु होता. तीन-चार दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंबात वादही झाला होता. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या विरोधात पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल केला होता. मात्र त्यानंतर त्यांच्यातील कुरबुरी सुरूच होती. त्याच्यातून अखेर शेषराव खुटेकर यांनी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलले. 


सुसाईड नोटमध्ये यांचा उल्लेख...


शेषराव खुटेकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये माझ्या आत्महत्येला हे लोकं जवाबदार असल्याचे म्हणत, पैठण तहसीलदार, नायब तहसीलदार,चव्हाण,उचित, पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एपीआय, बन्सी बापू, भाऊसाहेब बापू,मनोज बन्सी,  दिदास भाऊसाहेब, दीपक बन्सी,रविंद्र रमेश यांच्यासह आणखी काही लोकांची नावं लिहली आहेत. 


महत्वाच्या बातम्या...


Crime Story: आधी जेवणासाठी घेऊन गेले, त्यानंतर बील देत नाही म्हणून अपहरण केले


स्विमिंग पूलमध्ये हृदयविकाराचा झटका; मालेगावमध्ये 19 वर्षीय युवकाचा मृत्यू, घटनेचं CCTV समोर