Maharashtra Samruddhi Mahamarg: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 11 डिसेंबरला लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला समृद्धी महामार्ग आता सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आला आहे. मात्र याचवेळी एसटी महामंडळाने (ST Mahamandal) महत्वाचा निर्णय घेतला असून समृद्धीवरून औरंगाबाद ते नागपूर (Aurangabad To Nagpur) एसटीचा प्रवास करता येणार आहे. 15 डिसेंबरपासून औरंगाबाद ते नागपूर अशी एसटीची एक्स्प्रेस समृद्धी महामार्गावरून धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तब्बल 10 जिल्ह्यातील 26 तालुके आणि 391 गावातून जाणारा समृद्धी महामार्ग अखेर प्रवासासाठी सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार असून, प्रवास सुखकर होणार आहे. सद्या या महामार्गावरून चारचाकी आणि मोठ्या वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र आता लवकरच यावरून एसटीच्या एक्स्प्रेस बस देखील धावणार असून, याची तयारी एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे. तर या मार्गाचा सुखद अनुभव प्रवाशांना देण्यासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली असून, 15 डिसेंबरपासून औरंगाबाद ते नागपूर अशी एक्स्प्रेस समृद्धी महामार्गावरून धावणार आहे.
असा होणार फायदा...
एसटी महामंडळाने आपल्या प्रवाशांना कमी वेळात नागपूरला पोहोचवण्यासाठीचे विशेष नियोजन केले असून, या महामार्गावरून 15 डिसेंबरपासून औरंगाबाद ते नागपूर ही बस धावणार आहे. मात्र ही गाडी किती वाजता सोडायची याबाबत अद्याप निर्णय झाला नसून, नियोजन सुरु आहे. तर नागपूर गाठण्यासाठी सद्या एसटीला सुमारे 12 तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र समृद्धी महामार्गामुळे हे तास कमी होऊन सात ते आठ तासांवर येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
औरंगाबाद शिर्डी एक तासात...
समृद्धी महामार्गाचा फायदा औरंगाबाद ते शिर्डी (Aurangabad To Shirdi) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील होणार आहे. कारण समृद्धी महामार्गामुळे आता औरंगाबाद ते शिर्डी अवघ्या एका तासात पूर्ण येणार आहे. यामुळे औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील (Jalna District) साई भक्तांचा प्रवास आता कमी वेळेत शिर्डी गाठता येणार आहे. त्यामुळे औरंगाबादहून शिर्डी जाण्यासाठी वैजापूर व श्रीरामपूरमार्गे आदळ- आपट करीत चार तासांत शिर्डीत जाण्याच्या जाचातून भाविकांची सुटका होणार आहे. यासाठी प्रवाशांना 170 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे.