Aurangabad To Pune Expressway: औरंगाबाद-अहमदनगर-पुणे एक्सप्रेस-वेचा (Aurangabad Pune Expressway) मार्ग मोकळा झाला असून, पुण्यानंतर आता औरंगाबादेतील भूसंपादनाला देखील लवकरच सुरुवात होणार आहे. मंगळवारी यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी भूसंपादन अधिकारी नियुक्त करण्यात येणार असून, त्यानंतर भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यात औरंगाबाद, पैठण तालुक्यांतील 24  गावांमधून हा एक्सप्रेस-वे जाणार आहे.


औरंगाबाद-अहमदनगर-पुणे एक्सप्रेस-वेच्या कामाला केंद्र सरकारने भारतमाला फेज-2 योजनेअंतर्गत (Bharatmala Project) मंजुरी दिली आहे. तर यावरून पुणे जिल्हाधिकारी यांनी या महामार्गासाठी भूसंपादन अधिकारी नियुक्त करून प्रक्रियेला सुरुवातदेखील केली आहे. मात्र पुण्यात जरी भूसंपादनाला सुरवात झाली असली तरीही, अहमदनगर आणि औरंगाबादेत ही प्रक्रिया अद्यापही सुरू झाली नव्हती. मात्र अखेर मंगळवारी यासंदर्भातील एक पत्र जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना प्राप्त झाले आहे. त्यानुसार आता महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी औरंगाबाद, पैठण तालुक्यांतील 24  गावातील जमिनी भूसंपादन केले जाणार आहे. 


'या' गावांचा समावेश



  • औरंगाबाद तालुका: पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बी.के., चिंचोली, घारदोन,
     

  • पैठण तालुका: वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, ववा, वरुडी बी.के., पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहांगीर, पाटेगाव, साईगाव, पैठण एमसी १


लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया


औरंगाबाद-अहमदनगर-पुणे एक्सप्रेस-वेचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत केले जाणार आहे. त्यामुळे निश्चित झालेल्या नकाशानुसार भूसंपादन केले जाणार आहे. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यात पैठणमधील 17 आणि औरंगाबाद तालुक्यातील 7 अशा 24 गावांतून हा एक्स्प्रेस-वे जाणार आहे. त्यामुळे या गावात लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांत राष्ट्रीय महामार्गाने निश्चित केलेल्या रेखांकनानुसार जमीन मोजणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 


असा असणार औरंगाबाद-अहमदनगर-पुणे एक्सप्रेस-वे


औरंगाबाद- अहमदनगर-पुणे एक्सप्रेस-वे हा दहा पदरी असणार आहे. ज्यात पुणे ते औरंगाबाद 270  किलोमीटरचे अंतर असणार आहे. या महामार्गावर वाहनांचा तासी वेग 100 ते 120 असणार आहे. त्यामुळे औरंगाबादहून अहमदनगर आणि पुण्याला जाणाऱ्या वाहनधारकांचा प्रवास सुखकर तर होणारच आहे पण वेळीचीही मोठी बचत होणार आहे. 


Samruddhi Mahamarg: समृद्धीवरून औरंगाबाद ते नागपूर एसटी बस धावणार, 15 डिसेंबरपासून सुरवात