Aurangabad: भाजपकडून अतुल सावेंना संधी मिळण्याची शक्यता; महापालिकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने...
Aurangabad: आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला याचा फायदा होऊ शकतो, यानुसार सावे यांना आज संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
Aurangabad News: सकाळी 11 वाजता राजभवन या ठिकाणी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातून शिंदे गटाचे संदिपान भुमरे आणि संजय शिरसाट यांचे नाव निश्चित समजले जात आहे. मात्र त्याचबरोबर आता भाजपकडून आमदार अतुल सावे यांचे नाव सुद्धा चर्चेत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अतुल सावे यांना मंत्रिपद दिली जाण्याची शक्यता असून, त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे गेल्यावेळी भाजप-शिवसेनेच्या युतीत सुद्धा सावे मंत्री होते.
मुंबई महानगरपालिकाप्रमाणेच औरंगाबाद महापालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहे. एवढच नाही तर काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी औरंगाबादचा पुढचा खासदार भाजपचाच असणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे औरंगाबादची सत्ता आपल्याकडे आणण्यासाठी भाजपकडून सावे यांना मंत्रीमंडळात संधी दिली जाऊ शकते.
हिंदुत्ववादी चेहरा...
औरंगाबादचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास पाहिला तर खाण की बाण यावर शिवसेनेने निवडणूक लढवत सत्ता कायम ठेवली आहे. त्यामुळे भाजपकडून सुद्धा हिंदुत्ववादी चेहरा देण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो. सावे यांचे वडील मोरेश्वर सावे यांची कधीकाळी कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख होती. तर मोरेश्वर सावे हे कारसेवक म्हणून आयोध्येला गेले होते. त्यामुळे मंत्रिमंडळात अतुल सावे यांना संधी देऊन एक हिंदुत्ववादी चेहरा समोर करण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला याचा फायदा होऊ शकतो, यानुसार सावे यांना आज संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
सावे यांचा राजकीय प्रवास...
- 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले.
- 2018 मध्ये भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री झाले.
- 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आले.
महत्वाच्या बातम्या...
Maharashtra Cabinet Expansion:अब्दुल सत्तार मुंबईत तळ ठोकून; मंत्रीपद मिळणार की संधी हुकणार?