Aurangabad News: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare)  आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरीवंद केजरीवाल (Arvind Kejriwal)  यांच्यात शाब्दिक वाद आता आणखीच वाढतांना पाहायला मिळत आहे. भाजप अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला आता अण्णा यांनी उत्तर दिले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना मी घरी बसवलं असल्याचे अण्णा म्हणाले. अण्णा हजारे औरंगाबाद दौऱ्यावर असून, यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या लिकर धोरणावरून मुख्यमंत्री केजरीवाल यांना खरमरीत पत्र लिहिले होते. त्यावर प्रतिक्रिया देतांना, भाजप अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत असल्याचं केजरीवाल म्हणाले होते. अण्णा यांना भाजप बोलायला लावत असल्याचा आरोपही  केजरीवाल यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला अण्णांनी उत्तर दिले आहे. 


काय म्हणाले अण्णा... 


तुम्हाला भाजप बोलायला लावत आहे या आरोपावर बोलतांना अण्णा म्हणाले की, त्यांना काय बोलायचं बोलु द्या, मात्र मी सुद्धा भाजपच्या अनेक नेत्यांना घरी बसवलं आहे याचीही आठवण त्यांनी ठेवावी. यापेक्षा जास्त काय बोलू असा टोला अण्णांनी केजरीवाल यांना लगावला आहे. तर यावर आणखी बोलण्यास त्यांनी नकार दिला. 


अण्णा हजारे यांनी लिहिले केजरीवालांना पत्र 


दिल्लीच्या लिकर धोरणावर मुख्यमंत्री केजरीवाल यांना अण्णांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात अण्णा हजारे म्हणाले की, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदा पत्र लिहित आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सरकारच्या दारू धोरणाबाबत येत असलेल्या बातम्या वाचून खूप वाईट वाटत आहे.


'आता हे अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहेत', केजरीवालांचा भाजपवर निशाणा


राजकारणात येण्यापूर्वी तुम्ही ‘स्वराज’ नावाने एक पुस्तक लिहिले. या पुस्तकाची प्रस्तावना तुम्ही माझ्याकडून लिहून घेतली होती. याच 'स्वराज' नावाच्या पुस्तकात तुम्ही ग्रामसभा, दारू धोरण याविषयी खूप छान गोष्टी लिहिल्या होत्या,याची तुम्हाला आठवण करून देतोय. तुमच्या या पुस्तकात तुम्ही बऱ्याच आदर्शवादी गोष्टी लिहिल्या होत्या. तेव्हा मला तुमच्याकडून खूप आशा होत्या. मात्र राजकारणात गेल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर आदर्श विचारसरणीचा तुम्हाला विसर पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे तुमच्या सरकारने दिल्ली राज्यात नवीन दारू धोरण तयार केले असावे, असा टोला अण्णा यांनी या पत्रातून केजरीवाल यांना लगावला आहे.