Suicide: चार वर्षाच्या मुलासह महिलेची विहरीत उडी घेऊन आत्महत्या
एका महिलेचा चार वर्षाच्या मुलासोबत मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.
Woman Suicide With Child: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कारकीन गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार वर्षाच्या मुलासह एका 30 वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. घरगुती कारणावरून झालेल्या वादानंतर या महिलेने स्वतःच्या शेतातील विहिरीत मुलासह उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीसह महिलेला विहिरीच्या बाहेर काढलं.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील कारकीन येथील बानोबी शहाजान शहा ( वय 30 वर्ष, रा. कारकीन ) या महिलेचे आपल्या पतीसोबत घरगुती काराणावरून वाद झाला होता. पतीसोबत झालेल्या वादानंतर बानोबी सायंकाळी 5 वाजता रागाच्या भरातून घरातून निघून गेल्या. यावेळी साडेतीन वर्षांचा मुलाला सुद्धा सोबत नेले. दरम्यान आज सकाळी एक व्यक्ती शेतात चक्कर मारायला गेला असता, त्याला विहिरीत बानोबी आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलाचा मृतदेह पाण्यात तरंगताना पाहायला मिळाला. त्यानंतर याबाबत पैठण एमआयडीसी पोलीसांना माहिती देण्यात आली.
पोलीस घटनास्थळी...
एका महिलेचा लहान मुलासोबत विहिरीत मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहायला मिळाल्याची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मुलाचा आणि महिलेचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह उत्तर तपासणीसाठी औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर ज्या विहिरीत मृतदेह आढळून आला ते शेत बानोबी यांचेच असल्याचं समोर आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावेळी पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पती फरार...
बानोबी यांचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र बानोबी यांचा पती घटना उघडकीस आल्यापासून फरार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोमवारी रात्री नेमकं काय घडलं आणि बानोबी यांनी केलेल्या आत्महत्येचे कारण काय हे त्यांच्या पती समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे फरार पतीला शोधण्यासाठी पोलिसांचा एक पथक नेमण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.