Aurangabad Crime News: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील एक चोरीची घटना सद्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण चोरट्यांनी चक्क चालू 'विद्युत डीपी'च काढून नेली आहे. त्यामुळे आता आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, शेतवस्तीवर राहणाऱ्यांवर अंधारात रात्र काढावी लागणार आहे. याबाबत पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला गावकऱ्यांनी माहिती दिली आहे. 


स्थानिक गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील अंदाजे तीन हजार लोकसंख्या असलेल्या घायगावात काल रात्री चोरट्यांनी शेतातील 'विद्युत डीपी'वर डल्ला मारला. मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या चोरट्यांनी चक्क चालू विद्युत डीपी बंद करून तिला खाली उतरवत तिच्यातील महत्वाच्या वस्तू सोबत घेऊन गेले. विशेष म्हणजे डीपीचा वरील भाग जागेवरून सोडून त्यातील महत्वाचे धातू चोरट्यांनी सोबत नेले आहे. सकाळी शेतात कामासाठी शेतकरी आल्यावर या घटनेचा खुलासा झाला. गावकऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना आणि संबधित प्रशासनाला दिली आहे. 


शेतकऱ्यांची अडचणीत वाढ...


याबाबत गावाचे सरपंच हरिदास साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्युत डीपीवर आजूबाजूला राहणाऱ्या 70 ते 80 शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन आहे. त्यामुळे आता विद्युत डीपी नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. तसेच याबाबत प्रशासनाला माहिती दिली असून ते पंचनामा करण्यासाठी येणार असल्याची माहिती साळुंके यांनी दिली आहे. 


परिसरात चर्चेचा विषय...


घरातील साधा वायर जोडायचा म्हंटले की आपण इलेक्ट्रिशनचं काम करणाऱ्या व्यक्तीला शोधतो. मात्र या चोरट्यांनी चक्क चालू विद्युत डीपीच खोलून चोरी केली आहे. त्यामुळे गावात आणि परिसरात या हटके चोरीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. तर अनेकजण शेतात येऊन डीपीची चोरी कशी केली असेल याची पाहणी करून सुद्धा जात आहे. 


डीपीतील तांब्यासाठी चोरी...


विद्युत डीपीमध्ये काही महत्वाचे धातू असतात, ज्यात तांब्याच्या धातूचा प्रमाण अधिक असते. विशेष म्हणजे बाजारात तांब्याच्या धातूची किमंत अधिक आहे. एका विद्युत डीपीमध्ये तब्बल 50 हजारांचा तांब्याच्या कॉईल असतात. म्हणून चोरांनी विद्युत डीपीला आपले लक्ष बनवले आहे. तसेच यापूर्वी सुद्धा अशाच काही चोरीच्या घटना सुद्धा समोर आलेल्या आहे. त्यामुळे आता या चोरांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: दोन मुलींसह आईने तुडुंब भरलेल्या विहिरीत घेतली उडी; औरंगाबादच्या झोडेगावातील घटना


डोक्यावर हात ठेवून आजार दूर करण्याचा दावा करणाऱ्या बाबाविरोधात चौकशी सुरु; पोलिसांची माहिती