Aurangabad: महाविकास आघाडीत शिवसेनेला न्याय मिळत नव्हता म्हणून, भाजपसोबत येऊन सत्ता स्थापन केल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह भाजपच्या अनेक नेत्यांनी केला आहे. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपला न्याय मिळत नसल्याचे आरोप होऊ लागले आहे. विशेष म्हणजे तेही शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या मतदारसंघातच हा प्रकार समोर आला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी निधी देऊनही कृषिमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या ताब्यातील सिल्लोड नगर परिषदेचे प्रशासन नाहरकत देत नसल्याने भाजपाच्या एका नगरसेविकेने आपल्या पदाचा राजीनामा (BJP Corporator Resigns) दिला आहे. रूपाली मोरेल्लू असे राजीनामा देणाऱ्या नगरसेविकेचं नाव आहे. 


अब्दुल सत्तार यांच्याकडून आपल्या मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची कामे केली जात नसून, त्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप यापूर्वीही अनेकदा झाला आहे. मात्र आता शिंदेसेना आणि भाजप सोबत सत्तेत आहे. पण राज्यात भाजप व शिंदेसेना मित्र पक्षाचे सरकार असूनही निधी उपलब्ध झाल्यानंतर तो खर्च करण्यासाठी मात्र आडकाठी होत असून, मंदिर सभागृहाच्या कामासाठी अडसर ठरत आहे. त्यामुळे व्यथित होऊन नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचं भाजपाच्या नगरसेविका रूपाली मोरेल्लू यांनी म्हंटलं आहे.  


काय आहे प्रकरण... 


केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सिल्लोड शहरातील समतानगर, शिवाजीनगर भागातल्या सर्वेश्वर महादेव मंदिराच्या सभागृहासाठी 10 लक्ष रुपयांचा निधी दिला. दानवे यांनी निधी मंजूर करीत जिल्हाधिकारी यांना संबंधित कामाबाबत रीतसर प्रकिया सुरू करण्याचे निर्देशही दिले. त्यामुळे प्रभाग क्रमांक तीनच्या नगरसेविका मोरेल्लू यांनी नगर परिषद प्रशासनाकडे कामासाठी देखभाल व दुरुस्ती प्रमाणात पत्रासाठी मागील आठ महिन्यांपासून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. परंतु नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून हा विषय ढकलत असल्याचा आरोप मोरेल्लू यांनी केला आहे.


व्यथित होऊन दिला राजीनामा...


राज्यात भाजप व शिवसेना मित्र पक्षाचे सरकार असूनही निधी उपलब्ध झाल्यानंतर तो खर्च करण्यासाठी मात्र आडकाठी होत असून, मंदिर सभागृहाच्या कामासाठी अडसर ठरत आहे. त्यामुळे व्यथित होऊन नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे मोरेल्लू यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आता शिंदेसेनेकडून भाजपच्या पदाधिकाऱ्यांची अडवणूक केली जात असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.