Aurangabad: दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊन गोविंदाना शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याची शिंदे फडणवीस सरकारने घोषणा केली. त्यामुळे या निर्णयाने बरच वादंग निर्माण होण्याची चिन्ह दिसतायेत. दरम्यान साहसी खेळात दहीहंडीचा समावेश आणि गोविंदाना नोकरी देण्याचं आश्वासन यामुळे इतर साहसी खेळ आणि खेळाडूवर अन्याय करणारा होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. तर गोविंदांच्या नोकरी आरक्षणावर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्यांनी आक्षेप घेतला आहे. 


कृष्णजन्माष्टमीच्या गोरज मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देत गोविंदाना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. या घोषणेने क्रीडा विश्वात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. तर या नव्या घोषणेने अगोदरच साहसी खेळात करियर करणाऱ्या आणि त्यात पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंची मात्र पंचाईत झालीय. अडीच वर्षांपूर्वी महविकास आघाडी सरकारने ज्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना सरकारी नोकरीचे आश्वासन दिले होते, ते खेळाडू मात्र अजूनही नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यात आता गोविंदांना सहभागी करून सरकारने ही यादी लांबवलीय का असा प्रश्न खेळाडूंना पडलाय. 


सरकारची घोषणा जखमेवर मीठ चोळल्या सारखीच


औरंगाबाद मधील सागर मगरे या तरुणाला तलवार बाजीमध्ये राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील योगदान पाहून 2017 -18 मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आल होते. आज सागर तलवारबाजीचे कोचिंग घेऊन गेल्या 5-6 वर्षांपासून 10 ते 15 हजार महिन्यावर आपल्या कुटुंबाचा गाडा ओढतोय. त्यामुळे त्याच्यासाठी सध्याच्या सरकारची घोषणा जखमेवर मीठ चोळल्या सारखीच असल्याचं त्याने म्हंटलं आहे. 


आधी प्रतिक्षेतील खेळाडुंचा प्रश्न मार्गी लावा 


तर 30 वर्षाच्या शिवछत्रपती पुरस्कार मिळवणाऱ्या स्नेहा ढेपे यांचा या सरकारच्या निर्णयावर आक्षेप नाही. मात्र ऑलम्पिक दर्जाच्या तलवारबाजीमध्ये राज्य आणि देशपातळीवर चमकलेल्या स्नेहाला कटुंबाला जगवण्यासाठी खऱ्या अर्थाने नोकरी रोजगाराची गरज आहे. कोरोना काळात पती गमावलेल्या स्नेहाची जीवन म्हणजे करून कहाणी आहे. पतीच्या पाश्चात दोन मुल आणि आई वडिलांना सोबत घेऊन चालनारी स्नेहा सीजनेबल खाद्यपदार्थ बनवून ते विक्री करून उदरनिर्वाह करतेय. तिच्यासाठी हा निर्णय आक्षेपार्ह नसला तरी अगोदरच्या नोकरीच्या प्रतिक्षेतील खेळाडुंचा प्रश्न मार्गी लावावा अशी तिची इच्छा आहे.


क्रीडा क्षेत्रातील तज्ञ म्हणतात...


सरकारी टीका टिप्पणीच्या पुढे देखील काही प्रश्न उपस्थित होतात, ते म्हणजे ऑलम्पिक दर्जाच्या आणि 20-20 वर्ष खेळत करियर करणाऱ्या इतर खेळांच्या तुलनेत दहीहंडी खरच साहसी आहे का?... एकीकडे आंतराष्ट्रीय पदकतलिकेत वरच्या श्रेणीत येण्यासाठी त्या आंतराष्ट्रीय दर्जा खेळांना प्रोत्साहन देण्याऐवजी पारंपरिक लोकउत्सवाला खेळाचा दर्जा देऊन ती श्रेणी गाठता येईल का, शिवाय दहीहंडी या खेळप्रकारच्या नियमांवर देखील क्रीडा क्षेत्रातील तज्ञांनी प्रश्न चिन्ह लावलाय.


प्रश्न आणखी किचकट बनतील... 


आपल्या संस्कृतीत अनेक प्रथा परंपरा खेळाडू वृत्तीने साजऱ्या होतात. ही उत्सव साजरी होताना त्याकडे केवळ परंपरा आणि आस्था म्हणून पहायचे की आता खेळ म्हणून पहायचे याचा प्रश्न आता सरकार दरबारी आहे. एक मात्र निश्चित की अगोदरच मायबाप सरकारच्या नोकरी नावाच्या आश्वासनावर जगणाऱ्या खेळाडूंच्या नोकरीचा प्रश्न कायम असताना आता या नवं गोविंदची भर,प्रश्न आणखी किचकट बनवेल अस दिसतेय.