मुले पळवणारी टोळी समजून दोघांना मारहाण, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला
Aurangabad Crime: औरंगाबाद आणि जालना पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
Crime News: राज्यभरात सद्या मुले पळवणारी टोळी समजून मारहाणीच्या अनेक घटना समोर येत आहे. दरम्यान अशीच काही घटना औरंगाबादच्या सिल्लोड- भोकरदन रस्त्यावरील मुठाड फाट्यावर घडली आहे. मुले पळवणारी टोळी समजून कारमधील दोघांना मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री आठच्या वाजेच्या सुमारास घडली. यावेळी औरंगाबाद आणि जालना पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सखाराम जाधव पंधरा हे सहा वर्षाच्या आपल्या दोन नातवांसह दुचाकीने घरी जात होते. याचवेळी एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली व दुचाकीला फरफटत नेले. दरम्यान दुचाकीवरील दीपक झरे हा मुलगा कारच्या बोनटवर जाऊन आदळला. मात्र चालकाने कार न थांबवता भरधाव वेगात नेली. तब्बल आठ किलोमीटर दीपक बोनटला धरून होता. यावेळी मला वाचवा मला वाचवा असे तो ओरडत असल्याने नागरिकांना कारमध्ये मुले पळवणारी टोळी असल्याचा संशय आला.
कारमधील दोघांना मारहाण ...
कारमध्ये मुले पळवून नेणारी टोळी असल्याचा संशय आल्याने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी याची माहिती भोकरदन शहरातील नागरिकांना दिली. त्यामुळे भोकरदन शहरातील जमावाने दुचाकीव्दारे कारचा पाठलाग करत, कार अडवून त्यातील दोघांना मारहाण करायला सुरवात केली. तसेच बोनटवर अडकलेल्या दीपकची सुटका केली. यावेळी कारमध्ये असलेल्या दोघांना जमावाने केलेल्या मारहाणीत ते जखमी झाले आहेत.
मोठा अनर्थ टळला...
कारच्या बोनटवर एक मुलगा असून कार वेगात जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच कारमध्ये मुले पळवून नेणारी टोळी असल्याचा संशय असल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यामुळे घटनेची गंभीरता लक्षात घेत सिल्लोड शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज व भोकरदन पोलीस ठाण्याचे प्रमुख रत्नदीप जोगदंड यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाच्या ताब्यातून चालक बनकर व कारमधील व्यक्तीला सोडवून भोकरदन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
पोलिसांचे आवाहन...
ग्रामीण भागात सद्या मुले पळवणारी टोळी सक्रीय असल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर फिरत आहे. त्यामुळे यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नयेत. तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर संशय असल्यास याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी मात्र कायदा हातात घेऊ नयेत असे आवाहन भोकरदन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या...
Crime News: प्रात:विधीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल
मोठी बातमी! भगर विषबाधा प्रकरणी औरंगाबादमध्ये आठ किराणा दुकानदारांवर गुन्हे दाखल