Aurangabad Crime News: एखादा गुन्ह्यातील गुन्हेगार कोठेही लपून बसला तरीही पोलीस त्याला शोधून काढतातच असे अनेकदा समोर आले आहे. अशीच काही घटना औरंगाबादमध्ये पाहायला मिळाली आहे. चार वर्षांपूर्वी वाळूज येथील एका कंपनी मालकाच्या चुलतभावाचा खून (Murder) करून फरार झालेल्या आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. सोमेश सुधाकर इधाटे (रा. शिरोडी खुर्द, ता. फुलंब्री) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर चार वर्षांपूर्वी हत्या करून तो फरार झाला होता. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज येथील श्री इंजिनीअरिंग कंपनीत 23 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पूर्वी कंपनीत काम करणारा सोमेश इधाटे हा कंपनीत घुसला होता. कंपनीत कामाला नसताना तो कंपनीत घुसल्याने कंपनीमालकाचा चुलत भाऊ जगदीश प्रल्हाद भराड व सुपरवायझर मुकेश साळुंके यांनी सोमेश यास तू कंपनीत कशाला आलास अशी विचारणा केली होती. 


दरम्यान याचवेळी मोहन अवचार या कामगाराने सोमेश याच्या पाठीत प्लॉस्टिकची नळी मारल्याने संतप्त झालेल्या सोमेश याने रागाच्या भरात लोखंडी दांडा असलेले फावडे उचलून तो मोहन अवचार यांच्या अंगावर धावला. यामुळे मोहन हा कंपनीत पळून गेला. यावेळी सोमेश याने तेथे उभ्या असलेल्या कंपनी मालकाचा चुलत भाऊ जगदीश भराड यांच्या डोक्यात फावडे मारून गंभीर जखमी केले होते. ज्यात  जगदीश भराड यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर या घटनेनंतर आरोपी सोमेश इधाटे घटनास्थळावरून पळून गेला होता. तर या प्रकरणी आरोपी सोमेश इधाटे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


असा रचला सापळा 


जगदीश भराड यांची हत्या केल्यावर सोमेश इधाटे फरार झाला होता. फरार झाल्यानंतर सोमेश प. बंगाल, ओडिशासह इतर राज्यांत आपली ओळख लपवून मिळेल ते काम करून तिथे राहत होता. तसेच पोलिस पकडतील या भीतिपोटी तो सतत आपला ठावठिकाणा, तसेच नाव बदलून राहत होता. मात्र सोमेश त्याच्या मूळ गावी येणार असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे 23 जानेवारीला पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोडी गावात सापळा रचण्यात आला आणि तो येताच सोमेश येताच उपनिरीक्षक संदीप शिंदे व पोकॉ. राहुल बंगाळे यांनी सोमेशला ताब्यात घेतले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad News : पोटच्या मुलीला मोबाइलवर अश्लील व्हिडीओ दाखवून केला विनयभंग; नराधम बापास दीड वर्ष सक्तमजुरी