Devendra Fadnavis : पुढील तीन महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. ते शिक्षक मेळाव्यात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, '2012 पासून शिक्षक भरती बंद होती, पुढच्या 3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार आहोत. निवडणुका आहेत म्हणून फक्त घोषणा करायची हे आम्ही कधी करत नाहीत.' सर्वच जिल्ह्याकडून वाढीव मागण्या आल्या आहेत. मात्र आचारसंहिता असल्यामुळे सर्वच मागण्या मान्य करणे किंवा नव्या घोषणा करणे शक्य नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकरभरती करण्यात येणार आहे. याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने दोन महिन्यापूर्वी केली होती. राज्यात सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. त्यातच आता फडणवीसांनी 30 हजार शिक्षकांच्या भरती करण्याची घोषणा केली आहे. 


एका शिक्षकामुळे देशात अनेक मान्यवर तयार होतात. मी ज्या शाळेत, कॉलेजमधील शिक्षक मला कुठेही दिसले तर मला आदर वाटतो. आपली शाळा आपले शिक्षक आपण कधीच विसरत नाही. देश आज वेगाने प्रगती करतोय, गेल्या  पाच सात वर्षात देश 11 व्या स्थानावरून 5 व्या स्थानावर आला आहे, असे फडणवीस म्हणाले. 


आज पाकिस्तान मध्ये गहू पीठासाठी मारामारी होतेय, श्रीलंकेत महागाई शिगेला पोहचली आहे. पेट्रोल सुद्धा मिळत नाही, याउलट भारत प्रगती करतोय. जगात सर्वात जास्त तरुणांची संख्या अधिक आहे, जगात शिक्षण घेणारी पिढी सर्वात जास्त आहे. माझ्यासमोर बसलेले शिक्षकच ही पिढी घडवणारे आहेत. हळू हळू शिक्षक पद्धती वैश्विक करण्याचा विचार आपल्याला या पुढे करायचा आहे. शिक्षण क्षेत्रात जाणारा पैसा हा खर्च नसतो ती गुंतवणुक असते. या गुंतवणुकीचा मानव संसाधनाच्या रूपाने परतावा मिळत असतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


आम्ही जुन्या पेन्शनबाबत नकारात्मक नाहीत -


औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी शिक्षकांच्या प्रमुख मागणी असलेल्या जुनी पेंशन योजनेबाबत आपण नकारात्मक नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्माण केल्याच सांगत यामुळे सरकारी तिजोरीवर अडीच लाख कोटींचा ताण येईल आणि त्यासाठी काही वेगळा विचार करावे लागेल असेही फडणवीस म्हणाले. तर जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्याची धमक फक्त आमच्यातच असल्याचा खोचक टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. 


जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले आहे. दरम्यान यावर आता शिक्षक संघटनांची देखील प्रतिक्रिया आली आहे. शिक्षक मतदारसंघामध्ये जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न महत्वाचा मुद्दा असल्याने याबाबत शिक्षक संघटना आक्रमक आहेत. यामुळे याबाबत राजकारण सोडून शिक्षकांच्या या प्रमुख मागणीकडे सरकारने लक्ष द्यावे, तसेच हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी केली आहे.