Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. 5 जून  रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत. पुणे येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. काही दिवसांपूर्वी  शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. 


राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भोंग्याच्या विषयावर भाष्य केले. राज ठाकरे यांनी म्हटले की, भोंग्याचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक आहे. एका मुस्लिम पत्रकाराने बाळा नांदगावकर यांना सांगितले की त्यांचे बाळ लहान असताना त्यांना भोंग्याचा त्रास झाला.  त्यांनी स्वतः मशिदीत जाऊन भोंगा बंद करायला सांगितले. भोंग्याच्या आवाजाचा त्रास हा हिंदूनाच नाही तर मुस्लिमांनादेखील होत असल्याचे त्यांनी सांगितले.


कायद्यापेक्षा भोंगा मोठा आहे का?


या देशातील सुप्रीम कोर्ट, कायद्यापेक्षा भोंगा मोठा आहे का असा सवाल राज यांनी उपस्थित केला. ज्यांना कायद्यापेक्षा भोंगा मोठा वाटतो त्यांना जसास तसे उत्तर देणार असल्याचेही राज यांनी सांगितले. त्यांनी जर पाचवेळा भोंगा लावून अजान म्हटली तर आम्ही देखील पाचवेळा मशिदींसमोर आरती म्हणार असल्याचे राज यांनी सांगितले.  महाराष्ट्राची शांतता भंग करायची नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दंगल, हाणामारी करायची नाही. आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही. मात्र, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे असेही राज ठाकरे यांनी म्हटले. येत्या 3 मे पर्यंत भोंगे उतरावेत असेही राज यांनी सांगितले. 


औरंगाबादमध्ये जाहीर सभा


राज ठाकरे यांनी आपल्या आगामी जाहीर सभेची माहिती या पत्रकार परिषदेत दिली.  महाराष्ट्र दिनी, एक मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी दिली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: