Sandipan Bhumre: राज्याचे रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान भुमरे यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. प्रचाराचा वेळ संपल्यावर देखील भुमरे यांनी उमेदवारांची बैठक घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे भुमरे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. तर आपण प्रचारासाठी नव्हे तर लग्नासाठी आलो होतो आणि त्यामुळे चहा पिण्यासाठी थांबलो असल्याचं भुमरे म्हणाले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचं वातावरण आत्तापासूनच तापतांना पाहायला मिळत आहे.


औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रचाराचा वेळ होता. मात्र असे असतांना भुमरे यांनी आपल्या पैठण मतदारसंघातील बिडकीन गावात उमेदवारांची बैठक घेतल्याचा आरोप केला जात आहे. तर यावेळी भुमरे यांनी मतदानाबाबत सूचना करतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामुळे भुमरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भुमरे यांनी ज्या गावात बैठक घेतली, त्याच गावात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली निघाली होती. त्यामुळे ही ग्रामपंचायत भुमरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जात आहे.


विरोधकांचा आरोप...


याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते दत्ता गोर्डे यांनी भुमरे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. प्रचाराचा पाच वाजेनंतर वेळ संपल्यावर देखील, भुमरे यांनी बिडकीनमध्ये बैठक घेतली. तसेच आचारसंहिता असलेल्या भागात शासकीय फौजफाटा वापरता येत नसतांना देखील भुमरे यांनी शासकीय फौजफाटा वापरला असल्याचा आरोप गोर्डे यांनी केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन भुमरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गोर्डे यांनी केली आहे.


भुमरेंनी आरोप फेटाळून लावले...


विरोधकांनी केलेले सर्व आरोप भुमरे यांनी फेटाळून लावले आहे. मी कोणत्याही प्रचारासाठी आलेलो नाही, मी कोणतीही घोषणाबाजी केली नाही, कुठेही फिरलो नाही. मी एका लग्नासाठी आलो होतो आणि त्यावेळी चहा पिण्यासाठी थांबलो असं म्हणत भुमरे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.


यामुळे बिडकीन गाव प्रतिष्ठेचं बनलं....


शिवसेनेत झालेल्या बंडखोडीनंतर आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा (Shiv Samvad Yatra) काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. दरम्यान औरंगाबादमध्ये आलेल्या आदित्य ठाकरे यांनी 23 जुलैला याच बिडकीन गावात (Bidkin Village) शिव संवाद यात्रा काढत संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या मतदारसंघात देखील शक्तिप्रदर्शन केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांच्या रॅलीला झालेल्या गर्दीची राज्यभरात चर्चा झाली होती. तर ज्या बिडकीन गावात आदित्य यांची रॅली निघाली त्याच बिडकीन गावात 12 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील रॅली निघाल्याने मोठी चर्चा झाली होती. तर शिंदे यांच्या रॅलीनंतर ठाकरे गटाकडून रस्त्यावर गोमूत्र शिपडून रस्ता स्वच्छ करण्यात आला होता. तेव्हापासून बिडकीन ग्रामपंचायत शिंदे ठाकरे गटासह भुमरे यांच्यासाठी प्रतिष्ठेचं बनलं आहे.


ही बातमी देखील वाचा


Maharashtra Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा! प्रचाराच्या तोफा थंडावल्या! रविवारी मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती जण रिंगणात?