Aurangabad Water Issue : फडणवीसांच्या ‘जल आक्रोश मोर्च्या’ची भाजपकडून जोरदार तयारी; शिवसेनेला घेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
Aurangabad Water Issue : औंरगाबादमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवला आहे. त्यासाठी आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा निघणार आहे.
Aurangabad Water Issue : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील पाणी प्रश्न आता गंभीर बनला आहे. तर दुसरीकडे यावरून राजकीय वातावरण सुद्धा तापताना पाहायला मिळत आहे. महानगरपालिका निवडणुका तोंडावर असून त्यापूर्वी भाजपकडून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली 23 मे रोजी शहरात भव्य ‘जल आक्रोश मोर्चा’काढण्यात येणार आहे. त्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे औरंगाबादमधील पाण्याच्या मुद्यावर थेट फडणवीसांची एन्ट्री होणार असल्याने स्थानिक शिवसेना नेत्यांची अडचण होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद शहरात सद्या अनेक भागात आठ-आठ दिवस पाणी येत नसल्याचे चित्र आहे. तर पाणी प्रश्नावरून सर्वसामान्य नागरिक आक्रमक होतांना दिसत आहे. गेल्या आठवड्यात याच मुद्यावरून महानगरपालिका आयुक्तांवर हल्ला सुद्धा करण्यात आला. गेली ३० वर्षे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे पण तरीही पाणी प्रश्न शिवसेनेला मिटवता आला नाही, असा आरोप सतत भाजपकडून करण्यात येत आहे. म्हणूनच महानगरपालिकेत पाणी प्रश्नावरून शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपने रणनीती आखली असून थेट फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येत आहे. तसेच खुद्द फडणवीस मोर्चात सहभागी होणार असल्याने औरंगाबादचा पाणी प्रश्न राज्याच्या राजकारणात पोहचणार आणि याचा फटका शिवसेनेला बसणार यात काही शंका नाही. त्यामुळे शिवसेना याला कसे उत्तर देणार, हे पाहणे तेवढेच महत्वाचे असणार आहे.
असा असणार मोर्चा....
औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून महाविकास आघाडीच्या विरोधात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरात 23 मे रोजी संध्याकाळी चार वाजता भव्य असा मोर्चा निघणार आहे. पैठणगेट येथून निघणारा मोर्चा महानगरपालिका कार्यालयावर धडकणार आहे. यासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक भागात भाजपकडून बैठका घेतल्या जात आहे. तर भाजपच्या स्थानिक आमदार, नगरसेवक आणि महत्वाच्या नेत्यांना मोर्चा यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या जवाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
शिवसेनेची सावध भूमिका....
शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून सर्वसामन्य नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. त्यात भाजपकडून सेनेला घेरण्याचा केला जात असेलेला प्रयत्न पाहता शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे. म्हणूनच पालकमंत्री सुभाष देसाईंनी पाणी पट्टी ५० टक्क्यांनी कमी केली आहे तर पाणी प्रश्नावरून शिवसेनेवर आरोप करणारे भाजपा महानगरपालिकेत सत्तेत सोबत होती त्यामुळे त्यांना आमच्यावर आरोप करण्याचा अधिकार नसल्याचं शिवसेनेकडून बोललं जात आहे.