छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागातील अनेक शेतवस्त्यांवर जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. चिखलासह गुडघाभर पाण्यातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचे चित्र असून शाळेला जायचे तरी कसे? असा सवाल विद्यार्थी करत आहे.
फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथे असेच दृष्य सध्या दिसत असून सुमारे २० वर्षांपासून विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना या रस्त्यावरुन जाताना कसरत करावी लागते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पुलासह रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांसह विद्यार्थी करत आहेत.
कच्चा रस्ता तातडीने दुरुस्त करा- ग्रामस्थांची मागणी
फुलंब्रीतील ग्रामीण भागात शेतवस्त्यांना गावातील मुख्य भागास जोडण्यासाठी कच्चा रस्ता असून पावसामुळे या रस्त्यावरून जाण्यासाठी वस्तीवरच्या मुलांना कसरत करावी लागते. या रस्त्यावर पावसामुळे गुडघ्यापर्यंत पाणी साठले असून केवळ पक्का रस्ता व पूल नसल्याने शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
जोरदार पावसामुळे रस्त्यांवर गुडघ्याएवढे साठले पाणी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीसह करमाड, जयपूर, भाम्बर्डा, लाडगाव आणि कुंबेफळ यासह आसपासच्या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे या शिवारातील असणारे छोटे-मोठे ओढे आणि नद्यांना काही काळ मोठ्या प्रमाणात पूर आला होता. याशिवाय शेतातही मोठं पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा:
Maharashtra Weather : मराठवाड्यासह विदर्भाला पावसानं झोडपलं, मुसळधार पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप