मुंबई : महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा (Monsoon) अंदाज देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मराठवाड्यासह विदर्भाला पावसानं चांगलं झोडपलं आहे. वाशिमच्या काकडदाती गावात मुसळधार पाऊस शेतीला तलावाचं स्वरूप आलं आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे, त्यामुळे शेतात पाणीच पाणी झालं आहे.


मुसळधार पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप


आज सलग चौथ्या दिवशी वाशिम जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वाशिम तालुक्यातील काकडदाती परिसरासह अनेक भागात मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानं शेती पेरलेल्या बियाण्यांसह खरडून गेलीय. या पावसामुळे शेतीला काही काळ तलावाचं स्वरूप आलं होतं, तर नाले ओसंडून वाहू लागले आहेत. नुकत्याच खरिपाची पेरणी केलेलं बियाणे पावसात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.


शेतशिवरांत पाणीच पाणी 


परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला, ईटलापूर माळी, दगडवाडी, मजलापूर, खंडाळा  या भागातील शेतशिवारामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे पेरण्यांना वेग येणार आहे. आधी कापूस. हळद लावलेल्या पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतातील काम लवकर बंद करून घरी यावं लागलं.सर्वत्र शेतशिवारा मध्ये पाणीच पाणी झाल्याचे चित्र या जोरदार पावसामुळे पाहायला मिळाले.


छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड, जयपूर, भाम्बर्डा, लाडगाव आणि कुंबेफळ यासह आसपासच्या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे या शिवारातील असणारे छोटे-मोठे ओढे आणि नद्यांना काही काळ मोठ्या प्रमाणात पूर आला होता. याशिवाय शेतातही मोठं पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.