नागपूर/औरंगाबाद : राज्यात गाजत असलेल्या बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणातील रॅकेटचा मुख्य सूत्रधार अंकुश राठोडला नागपूर पोलिसांनी औरंगाबादमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. तर बनावट क्रीडा प्रमाणपत्र बाळगणाऱ्या भाऊसाहेब बांगरलाही औरंगाबाद मधूनच अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एका शिक्षकाचा आणि पाटबंधारे विभागाच्या एका लिपिकाचा शोध पोलीस घेत आहेत. अंकुश राठोडच्या अटकेमुळे त्याच्या माहितीवरून पुढे इतर अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकल्याचे बनावट क्रीडा प्रमाणपत्र मिळवत राज्यात बोगस खेळाडूंनी शासकीय नोकरी लाटल्याचे अनेक प्रकरण गेले काही दिवसांपासून उघडकीस येत आहेत. त्यामुळे मैदानावर घाम गाळणाऱ्या प्रामाणिक खेळाडूंचे हक्क हिरावून घेतले गेले आहे. नागपुरात क्रीडा उपसंचालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून नागपूर पोलिसांनी राज्यभरातून अनेक अधिकारी आणि बोगस खेळाडूंना अटक करणं सुरु केले आहे. अगोदर ट्रम्पोलिन आणि टंबलिंग या क्रीडा प्रकाराचे बनावट प्रमाणपत्र देत अनेकांनी नोकऱ्या लाटल्याचे समोर आले होते. आता मात्र क्रीडा क्षेत्रातील या घोटाळ्याच्या तपासात पॉवर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात बनावट प्रमाणपत्राचा गौडबंगाल सुरु असल्याचे समोर आले आहे. नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यातील पथकाने काल (गुरुवार) रात्री बोगस प्रमाणपत्र प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अंकुश राठोडला औरंगाबाद येथून अटक केली आहे.
अनैतिक संबंधातुन तिहेरी हत्याकांड! मलकापूर तालुक्यातील घटना
अनेक अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता
पोलीस सूत्रानुसार बनावट क्रीडा प्रमाणपत्र घोट्याळ्याच्या तपासात अंकुश राठोडची अटक महत्वपूर्ण आहे. त्याच्या कबुली जबाबानंतर राज्याच्या क्रीडा विभागातील अनेक अधिकाऱ्यांची नावे या घोटाळ्यात समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल औरंगाबादमध्ये केलेल्या कारवाईत पोलिसानी अंकुश राठोडच्या दोन आलिशान गाड्याही जप्त केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अंकुश आणि त्याचे सहकारी जप्त केलेल्या गाड्यांवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो आणि पोलिसांचा बोर्ड लावून फिरत होते. अंकुश राठोडच्या अटकेनंतर आता पोलिसांना औरंगाबाद येथील प्राथमिक शाळेचा एक शिक्षक तसेच पाटबंधारे विभागातील एक लिपिकाचा शोध आहे.
बनावट प्रमाणपत्र प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. सांगलीतील उपशिक्षणधिकारी रवींद्र सावंत, पोलीस उपनिरीक्षक संजय सावंत, माजी क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांच्यासह एका क्रीडा अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
Nagpur Crime | गृहमंत्र्यांच्या नागपुरात पाठोपाठ झालेल्या हत्यांनंतर आता मोठी घरफोडी