अमरावती : लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) केलेलं वक्तव्य हे गंभीरतेने केलं नव्हतं, गमतीमध्ये आणि हसत हसत केलेलं होतं, ते वक्तव्य भावा-बहिणीमधील नात्यामध्ये केलेलं होतं असं स्पष्टीकरण आमदार रवी राणा यांनी दिलं. लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणीही काढून घेऊ शकत नाही, यावरून कुणीही राजकारण करू नये असंही ते म्हणाले. आम्हाला जर मतं मिळाली नाहीत तर लाडकी बहीण योजनेचे देण्यात येणारे 1500 रुपये काढून घेतले जातील असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केलं होतं. त्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती.  


रवी राणा म्हणाले की, त्याच्यामध्ये कुठेही कुणालाही वाईट वाटेल असं वक्तव्य केलं नव्हतं. भाऊ हा बहिणीचं कुठेही काढून घेऊ शकत नाही, उलट भाऊ हा बहिणीला मदत करतो. त्यामुळे कुणाचेही पैसे काढून घेण्यात येणार नाही. 


काँग्रेसने खोटं बोलून मतदान घेतलं, पण हे सरकार तसं करणार नाही. शिंदे सरकारकडून महिलांच्या खात्यावर पहिल्यांदा पैसे टाकण्यात येणार आहे असं रवी राणा म्हणाले.


काय म्हणाले होते रवी राणा? 


अमरावतीमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळ्यावेळी बोलताना रवी राणा म्हणाले होते की, आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करू. आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार.


या कार्यक्रमामध्ये अमरावती जिल्ह्यातील हजारो महिला उपस्थित होत्या. ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहते, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असं मतही रवी राणा यावेळी बोलतांना मांडलं.


आमदार रवी राणांनी केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.  रवी राणांवर टीका करताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, हा सरकारचा पैसा आहे. हा पैसा यांच्या बापाचा आहे का? रवी राणा की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा आहे? यांची निती दिसली.  निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी योजना आणली. बहिणींना फसवण्यासाठी योजना आणली आहे.  रवी राणा जे बोलला ते सरकारच्या शिंदेच्या मनातील, फडणवीस आणि अजित पवार यांच्या मनातील बोलले आहेत.


ही बातमी वाचा: