Maharashtra Politics अमरावती : जे लोक लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात नवनीत राणा या जातीच्या, त्या जातीच्या त्यांना मतदान करू नका, असं विरोधकांनी प्रचार केला. आता तेच लोक तुमच्या गावात पुन्हा आले तर त्यांना जोड्याने मारलं पाहिजे, असे पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य भाजपचे नेते आणि खासदार अनिल बोंडे यांनी केलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) प्रमानपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी घेतला होता. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात बोलताना भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी हे वक्तव्य केलंय.
जिल्ह्याचे न भरून निघणारे नुकसान आपण केलं- अनिल बोंडे
लोकसभेच्या निवडणुकी मध्ये एखादा नेता येतो आणि सांगतो नवनीत राणा या जातीच्या आहे. त्यांना मत देऊ नका, पण आता आपण आपले नुकसान करून बसलो आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे.राज्यात महायुतीचे सरकार आहे. मी देखील एक खासदार म्हणून केंद्रात काम करत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जर आपण नवनीत राणांना विजयी केलं असतं, तर आज अमरावतीच्या चेहरा मोहरा बदलला असता.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा न झाल्याने अमरावती जिल्ह्याचे न भरून निघणारे नुकसान आपण केलं आहे. नवनीत राणा यांना पाडल्याचा काही लोकांना विकृत व विखारी आनंद झाला. मात्र नवनीत राणा यांना पाडून अमरावती जिल्ह्याच खूप मोठे नुकसान झाले आहे. माझ्या जोडीला लोकसभेत नवनीत राणा यांना पाठविले असते तर जिल्ह्याचे खूप काही चांगले झाले असते. असेही खासदार अनिल बोंडे म्हणाले.
....नाहीतर दीड हजारही काढून घेऊ!
विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन अमरावतीतील याच कार्यक्रमात आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी देखील एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयेचे हे आम्ही दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असे धक्कादायक वक्तव्य रवी राणांनी केलंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमानपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला होता. त्यावेळी ते बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यभरातील वातावरण तापले असताना भाजप नेते अनिल बोंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना नुकतेच पुन्हा एकदा डिवचले होते. मनोज जरांगे स्वत: मुख्यमंत्री झाले तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कोणीही तशी वल्गना करु नये, असे बोंडे यांनी त्यावेळी म्हटले होते. अशातच त्यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता या वक्तव्याची विरोधकांकडून काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा