Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच, अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya 2024). हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. विवाह, गृहप्रवेश, सोनं खरेदी, वाहन खरेदी यांसारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.


वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच, तिसऱ्या दिवसी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. या वर्षी 10 मे 2024 रोजी अक्षय्य तृतीया हा सण आहे. अक्षय्य तृतीयेला (Akshay Tritiya) आखा तीज किंवा अक्षय तीज असंही म्हणतात. अक्षय्य तृतीयेला यावर्षीचा शुभ मुहूर्त नेमका कोणता आहे? जाणून घेऊया. 


अक्षय्य तृतीया 2024 कधी आहे? (When Is Akshaya Tritiya 2024?)


यंदा वैशाख शुक्ल तृतीया तिथी शुक्रवारी, 10 मे रोजी पहाटे 04:17 वाजता सुरू होईल. ही तिथी शनिवारी, 11 मे रोजी मध्यरात्री 02:50 पर्यंत राहील. म्हणजेच उदय तिथीनुसार, यंदा अक्षय्य तृतीया 10 मे रोजी आहे.


अक्षय्य तृतीया 2024 पूजा मुहूर्त (Akshaya Tritiya 2024 Pooja Muhurta)


अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी नारायण आणि कलशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 05:33 ते दुपारी 12:18 पर्यंत आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार 6 तासांच्या कालावधीत पूजा करू शकता. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रवि योग देखील जुळून आला आहे.


अक्षय्य तृतीया 2024 खरेदीचा शुभ मुहूर्त (Akshaya Tritiya 2024 Shubh Muhurta For Buying)


अक्षय्य तृतीयेला दिवसभर अबुज मुहूर्त असतो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकता. त्या दिवशी कॅलेंडर न पाहता शुभ कार्य करता येतात. अक्षय्य तृतीयेला सोनं, दागिने, घर, दुकान, गाडी, जमीन, प्लॉट इत्यादी खरेदी करणं फार शुभ ठरतं.


अक्षय्य तृतीया 2024 चे शुभ मुहूर्त (Akshaya Tritiya 2024 Shubh Muhurta)


चर-सामान्य मुहूर्त : सकाळी 05:33 ते 07:14
लाभ-उन्नती मुहूर्त : सकाळी 07:14 ते 08:56
अमृत-सर्वोत्तम मुहूर्त : सकाळी 08:56 ते 10:37
शुभ वेळ : दुपारी 12:18 ते 01:59
चर-सामान्य मुहूर्त : संध्याकाळी 05:21 ते 07:02


अक्षय्य तृतीयेचं पौराणिक महत्त्व ( Akshaya Tritiya Importance)


अक्षय्य तृतीयेला पौराणिक महत्त्वही आहे. या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं मानलं जातं. द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवटही याच तारखेला झाला. भगवान विष्णूचा नर नारायण अवतार, हयग्रीव, परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाला.


हेही वाचा :


Budh Margi 2024 : 25 एप्रिलपासून 'या' राशींना येणार अच्छे दिन; बुधाची सरळ चाल दाखवणार कमाल, पैसा हातात खेळणार