Bajrang Sonwane answer to Journalist : बीड लोकसभेचे (Beed Loksabha) महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी आज (दि.22)  उमेदवारी अर्ज  दाखल केला. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सोनावणेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका पत्रकाराने फाडफाड इंग्रजी बोलत प्रश्न विचारला. दरम्यान, पत्रकाराने इंग्रजीत प्रश्न विचारल्यानंतर सोनवणेंची अडचण झाली. त्यांनी इंग्रजी येत नसल्याने हिंदीमधून प्रश्नाचे उत्तर दिले. बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) म्हणाले, मी नंतर याचे उत्तर देईल आणि त्यांनी बोलणे टाळले. 


माझ्यासमोर कोणाचीही फाईट नाही


बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यावेळी बोलताना म्हणाले, माझ्यासमोर कोणाचीही फाईट नाही. एकतर्फी निवडणूक होणार आहे. सध्या जी निवडणूक सुरु आहे, ती बीड जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाची आहे. आता निवडणुकीत आम्हाला चांगला पाठिंबा मिळतोय. त्यामुळे निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केले. 


पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे


बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांच्यामध्ये लढत होणार आहे. बजरंग सोनवणे यांच्यासमोर मोठी आव्हाने असणार आहेत. कारण दरवेळी त्यांच्यासोबत असणारे मंत्री धनंजय मुंडे यावेळी मात्र, पंकजा मुंडे यांना साथ देणार आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत गेल्यानंतर मुंडे बंधू आणि भगिनीमधील संघर्ष जवळपास मिटला आहे. पंकजा मुंडे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. 


बीडमध्ये मनोज जरांगेंचा प्रभाव


बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात बीड जिल्हा अग्रेसर आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पंकजा मुंडे यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतो. मात्र, मनोज जरांगे यांनी अद्याप तरी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही किंवा कोणाविरुद्ध मतदान करा, असंही काही सांगितलेलं नाही, त्यामुळे पंकजा मुंडेंच्या अडचणी सध्यातरी कमी आहेत. मात्र, मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा गणित तयार झाल्यास पंकजा मुंडेंची डोकेदुखी वाढू शकते. निवडणुकीत बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे आमने सामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 


Bajrang Sonawane English : पत्रकाराने इंग्रजीत विचारला प्रश्न, बजरंग सोनावणे चांगलेच गोंधळले!